एम्यूजमेंट पार्क असे संबोधन, पर्यटकांच्या संख्येचा महापूर
जर तुमचे शहर जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांपैकी एक असेल तर तुम्ही नाराज व्हाल का? तुमच्या शहरात मोठ्या संख्येत पर्यटक येत असतील तुम्ही दु:खी व्हाल का? परंतु असे एका शहरात घटत आहे. इटलीतील प्रसिद्ध व्हेनिस शहराचे लोक वाढत्या पर्यटनामुळे नाराज झाले आहेत. पर्यटनामुळे शहरांच्या रस्त्यांची अवस्था खराब झाली आहे. याच नाराजीतून स्थानिक लोक आता स्वत:च्या शहरालाच अन्य नावाने संबोधू लागले आहेत. हे लोक आता व्हेनिसला व्हेनिसलँड म्हणू लागले आहेत. शहर एक एम्यूजमेंट पार्क ठरल्याची टीका त्यांच्याकडून होत आहे.
स्वत:चे सुंदर चौक, महाल आणि कालव्यांसाठी प्रसिद्ध हे लोकप्रिय स्थळ दरवर्षी सुमारे 3 कोटी पर्यटकांना आकर्षित करते. परंतु या संख्येमुळे अनेक मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे अधिकाऱ्यांनी आता उन्हाळ्यात येथे येणाऱ्या पर्यटकांवर 5 युरो म्हणजेच जवळपास 500 रुपयांचा कर लावला आहे.
तरीही स्थानिक लोक एक दिवसापेक्षा अधिक काळ थांबणाऱ्या पर्यटकांमुळे उदभवणाऱ्या समस्यांना हाताळण्यास हा कर उपयुक्त ठरणार नसल्याचे मानत आहेत. 5 युरोचा कर व्हेनिसमध्ये पर्यटकांच्या गर्दीला कसे कमी करणार? व्हेनिसला पोहोचण्यासाठी प्रवास आणि हॉटेल्सवर शेकडो युरो खर्च करणारा पर्यटक 5 युरोची चिंता करेल का असा प्रश्न स्थानिक लोक उपस्थित करत आहेत.
व्हेनिस एका जिवंत शहरापेक्षा अधिक ‘संग्रहालय’ ठरले असल्याची टिप्पणी एका स्थानिक रहिवाशाने केली. आमचे ऐतिहासिक शहर आता एम्यूजमेंट पार्कमध्ये बदलले आहे, हे शहर आता भंगाराच्या दुकानांनी भरलेले आहे, हे आता व्हेनिसलँड ठरले असल्याची प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केली आहे. सामूहिक पर्यटकाने शहराचा गळा घोटला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.









