अध्याय पंचविसावा
भगवंत उद्धवाला त्रिगुण एकमेकात मिसळून माणसाच्या जीवनात कसा प्रभाव टाकतात ते समजून सांगत आहेत. ते म्हणाले, गृहस्थाश्रम सर्व आश्रमात श्रे÷ खरा पण त्याच्यावरही त्रिगुणांचा प्रभाव असतो. म्हणून गृहस्थाने रज, तम गुणामुळे चित्तात निर्माण झालेले दोष निवारण करण्यासाठी, नित्य नैमित्तिक कर्म करणे आणि स्वधर्म पाळणे, ही कर्तव्ये पार पाडावीत. गुणांच्या संगतीने गुणांच्या पलीकडे असलेला आत्माही गुणकर्मामध्ये वागू लागतो. माणसाच्या ठिकाणी शमदमादी गुणांवरून सत्त्वगुण, कामादी प्रवृत्तींवरून रजोगुण आणि कामक्रोध इत्यादींवरून तमोगुण प्रबल आहे हे लक्षात येते. जो योग्य प्रकारे इंद्रियनिग्रह करतो, जो शमदमात निरंतर खेळत असतो, ज्याच्या अंतःकरणात शांती राहते, तो सात्त्विक आहे असे समज. जो सदोदित फलेच्छेने लोभी बनलेला असतो, संसारभोगातील सुखाची इच्छा करतो, द्रव्यासाठी पाहिजे ते ढोंग करतो, तो मनुष्य रजोगुणी होय. स्वधर्मामध्ये ज्याला प्रेम वाटत नाही, अधर्मप्रवृत्तीच आवडते, क्रोधाने आणि लोभाने ज्याची स्फूर्ती गिळूनच टाकलेली असते, तो तामसी होय. अशा प्रकारे पुरुषाचे कर्माचरण पाहून त्याचे लक्षण ओळखावे. सामान्यतः या तिन्ही गुणांचे निरूपण सांगितले. त्याच गुणांच्यामुळे भिन्नभिन्न स्वभावाच्या व्यक्ती कशा ओळखाव्यात तेही सांगतो. पुरूष असो की स्त्री, जेव्हा निष्काम भावनेने, जी व्यक्ती आपल्या नित्यनैमित्तिक कर्मांनी माझी आराधना करते, तेव्हा ती व्यक्ती सत्त्वगुणी समजावी. आपण स्वकर्म आचरीत असता त्यांत फळाची इच्छा धरणे हेच मायेचे मोठे पटल होय. पण ती फळाची आशा निखालस सोडून देऊन जे मत्स्वरूप होऊन माझ्याच भजनात निमग्न असतात, ते खरोखर सत्त्वगुणसंपन्न जाणावेत. देहाच्या अवयवांचे जे स्वरूप दिसते त्यावरून स्त्री किंवा पुरुष हे नाव प्राप्त होत असते परंतु त्या स्त्रीपुरुषांमध्ये जो ईश्वरी अंश असतो त्यात आत्मी व आत्मा असा भेद असत नाही. त्यांच्यात जीवभाव सारखाच असतो. एकाग्र चित्तवृत्ती ठेवून जे क्रियेचे आचरण होते, त्याचे नांव कर्म. ते निरपेक्ष रीतीने करत असताना जे माझे भजन करत असतात, तोच संपूर्ण स्वधर्म होय. उद्धवा! अशा स्वधर्मवृत्तीने जेथे माझी भक्ती प्रगट होते, ती ती खरोखर सात्त्विक वृत्ती होय हे लक्षात ठेव. येथे अशी आशंका येते की, समजा स्वकर्म करताना फलाची आशा जर वाढत गेली, तर त्या फलाचा भोग भोगावा लागतो. मग अशा स्वकर्माने भक्ती कशी घडणार? अर्थात् असे स्वकर्म अत्यंत वाईट होय. कारण कर्म केले असता त्याचे फळ बाधक होते आणि ते न केले तर कर्तव्य टाळले म्हणून नरक भोगावा लागतो. अशा रीतीने ह्या संसारामध्ये कर्मानेच लोक बद्ध केले आहेत. जो जीव स्वतंत्र होता, तो कर्मानेच परतंत्र केला. इतके ह्या कर्माचे चरित्र अत्यंत विचित्र असून बाधक आहे. तेव्हा स्वकर्मानेच भगवद्भक्ती कशी घडेल? असा प्रश्न तुला तुला पडला असेल, तर त्याचं उत्तर ऐक, त्यासाठी एक उदाहरण आधी सांगतो जर सर्पाचे तोंड धरले तर तो साऱया अंगाला विळखे घालतो आणि त्या विळख्यांच्या भीतीने जर त्याचे तोंड सोडले, तर तो दंश करून तीव्र विषाने प्राणनाश करतो. असे सर्पदंशाचे संकट ज्याप्रमाणे मंत्रवादी किंवा गारुडी निवारण करतो, त्याप्रमाणे कर्मामध्येच उत्पन्न झालेली कर्माची बाधा गुरुराज तत्काळ नष्ट करतो. सद्गुरूला शरण गेले असता तो सर्व कर्म ब्रह्मार्पण करवतो, आणखी उद्धवा! निष्काम बुद्धीने भगवतसेवा करणाऱयाची खरं तर हीच इच्छा असते पण क्वचित एखाद्यावेळी केलेल्या कर्माचे फळ मिळावे अशी इच्छा निर्माण झाली तर सद्गुरू पुढे येऊन कर्म ब्रह्माला अर्पण करायची बुद्धी देतात. ब्रह्म हेच कर्माचे प्रकाशक आहे, म्हणून कर्म तितके सर्व ब्रह्मात्मकच होय. अशी भावना असणे हेच खरोखर मला कर्म अर्पण करणे होय. अशा रीतीने माझे भजन करावे. सर्व इंद्रियांमध्ये ज्ञानाची स्फूर्ती होणे ही ब्रह्माची ब्रह्मशक्ती होय. अशा निश्चयाने कर्माचे आचरण करणे ह्याचंच नांव स्वकर्मभक्ती होय. अशा प्रकारच्या स्वकर्माने स्वाभाविकपणेच जे जे भाविक मला भजतात, ते ते सर्व लोक, उद्धवा! शुद्ध सात्त्विक होत असे निःसंशय समज.
क्रमशः








