दैनंदिन जीवनात अडचणी : प्रशासन लक्ष देणार का?
बेळगाव : मागील काही महिन्यांपासून वयोवृद्ध, दिव्यांग, विधवा, निराधार लाभार्थ्यांची मासिक पेन्शन बंद झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांसमोर दैनंदिन गरजांसाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे आमच्याकडे कोणी लक्ष देणार का? असा प्रश्न लाभार्थ्यांतून उपस्थित होत आहे. शासनाकडून अंध, दिव्यांग, विधवा, वयोवृद्ध, निराधार लाभार्थ्यांना आर्थिक साहाय्य म्हणून मासिक पेन्शन दिली जाते. मात्र, पेन्शनच बंद झाल्याने दैनंदिन जीवनात अडचणी येऊ लागल्या आहेत. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी लाभार्थ्यांवर दुसऱ्याकडून हातउसने पैसे घ्यायची वेळ आली आहे. काही लाभार्थ्यांची सहा महिन्यांपासून पेन्शन बंद आहे. त्यामुळे आता काय करावे? आणि काय खावे? असा प्रश्नही काही निराधार लाभार्थ्यांना सतावू लागला आहे.
शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी पेन्शन दिली जाते. मात्र, पेन्शनच बंद झाल्याने लाभार्थ्यांना दैनंदिन गरजा भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजना दिल्या आहेत. त्यापैकी दोन सुरू केल्या आहेत. मात्र दुसरीकडे वृद्धाप, दिव्यांग आणि निराधारांची पेन्शन बंद झाल्याने संताप व्यक्त होऊ लागला आहे. याबाबत तहसीलदार कार्यालयात चौकशी केली असता तलाठ्याकडे बोट दाखविले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची ससेहोलपट होऊ लागली आहे. आम्ही नवीन पेन्शन सुरू करायची की जुनीच पेन्शन पूर्ववत होणार, असा प्रश्न लाभार्थ्यांना सतावू लागला आहे. मात्र, तहसीलदार कार्यालयातून लाभार्थ्यांना पेन्शनविषयी व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने लाभार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. शिवाय पेन्शनपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे प्रशासन आमच्याकडे लक्ष देणार का? असा प्रश्नही लाभार्थ्यांनी केला आहे.









