वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सध्या जे निवृत्तीवेतन धारक आहेत, त्यांची निवृत्तीवेतनाची रक्कम कमी होणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले केले आहे. केंद्र सरकारने नुकतेच व्हेलिडेशन ऑफ सेंट्रल पे कमिशन (पेन्शन) रुल्स अँड प्रिन्सिपल्स फॉर एक्स्पेंडिचर हे विधेयक संसदेत संमत करुन घेतले आहे. त्यामुळे आपली निवृत्तीवेतनाची रक्कम कमी होईल, अशी चिंता काही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. तथापि, या विधेयकामुळे तसे काही होणार नाही. जे केंद्रीय कर्मचारी 1 जानेवारी 2016 पूर्वी निवृत्त झाले आहेत, त्यांना जे कर्मचारी 1 जानेवारी 2016 किंवा या दिनांकानंतर निवृत्त झाले आहेत, त्यांच्याइतकेच निवृत्ती वेतन मिळत राहील. केंद्र सरकारने व्हेलिडेशन विधेयक संमत करुन घेतल्याने या स्थितीत कोणतेही परिवर्तन होणार नाही. केंद्रीय वेतन आयोगाने केंद्र सरकारला हे विधेयक संमत करुन घेण्याची सूचना केली होती. या विधेयकामुळे निवृत्ती वेतनाच्या दोन योजनांच्या लाभार्थींमधील अंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे हे विधेयक संमत करुन घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन त्यांनी राज्यसभेत केले आहे. कर्मचाऱ्यांनी गोंधळ करुन घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.









