वृत्तसंस्था /नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) वाढीव निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 11 जुलैपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी, ‘ईपीएफओ’ने 26 जून 2023 पर्यंत वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी दिली होती. पण, आता अधिक पेन्शन मिळवण्यासाठी लाभार्थींना 11 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. सदर योजना सर्वांसाठी नसून सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार ‘ईपीएफओ’चे काही सदस्यच अर्ज करू शकतात. संबंधित लाभार्थी ‘ईपीएफओ’कडून अधिक पेन्शन निवडण्याची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी करत होते. गेल्यावषी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ‘ईपीएफओ’ने लोकांना हा पर्याय निवडण्यासाठी 4 महिन्यांची मुदत दिली होती. त्यानंतर सुरुवातीला अर्ज करण्याची सुविधा 3 मे पर्यंत आणि दुसऱ्यांदा 26 जूनपर्यंत वाढवली होती. आता पुन्हा ही मुदत 11 जुलैपर्यंत वाढविण्यात आली आहे.









