सुवर्णसौधसमोर छेडले आंदोलन
बेळगाव : अनुदानित शाळा व महाविद्यालयांतील अनेक शिक्षक पेन्शनविनाच सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या त्यांना अनेक आजार जडले असून त्यांच्या भविष्यासाठी त्यांना निवृत्तीपेन्शन द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी कर्नाटक राज्य अनुदानित शाळा व महाविद्यालये पेन्शन वंचित कर्मचारी संघातर्फे सुवर्णसौधसमोरील कोंडुसकोप येथे आंदोलन केले. राज्य सरकारने आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आश्वासनाप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन स्कीम लागू करावी. 1 एप्रिल 2006 पूर्वी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुदानापूर्वीच्या सेवेचा विचार करावा. ज्योती संजीवनी योजना लागू करावी. अनुदानित शाळांमधील रिक्त पदे तातडीने भरावीत, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. यावेळी राज्यभरातील विनाअनुदानित शाळांमधील निवृत्त शिक्षक सहभागी झाले होते.









