कोल्हापूर / विनोद सावंत :
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील 30 हजारांहून अधिक लाभार्थ्यांच्या पेन्शनला ब्रेक लागला आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही त्यांच्याकडून आधारकार्डचे बँक खात्याशी केवायसी देण्यास टाळाटाळ केल्याने आणि आधारकार्ड व्हॅलिडेशन वेळीच केले नसल्याने त्यांना हा फटका बसला आहे. आठ दिवसांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली तरच त्यांना नियमित पेन्शन सुरू होणार आहे
राज्य शासनाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना राबवण्यात येत आहेत. यातील लाभार्थ्यांना महिन्याला 1500 रुपये पेन्शन अथवा अनुदान मिळत आहे. यापूर्वी हे पैसे राज्य सरकारकडून तहसीलदारांमार्फत संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यांवर जमा केले जात होते. त्यानंतर संबंधित लाभार्थ्यांकडून बँकेत जाऊन ही रक्कम काढली जात होती. परंतु सरकारने आता पेन्शनची रक्कम ‘डीबीटी‘द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरूवात केली आहे. या महिन्यांपासून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. यासाठी लाभार्थ्यांच्या आधारकार्डचे बँक खात्याशी ‘केवायसी’ असणे महत्त्वाचे आहे. कोल्हापूर जिह्यात आतापर्यंत 90 टक्के लाभार्थ्यांनी केवायसीचे काम पूर्ण केले आहे; परंतु ज्यांचे बँक खात्याशी ‘केवायसी’ झालेले नाही, अशा लाभार्थ्यांची या महिन्याची पेन्शन जमा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थी पेन्शनपासून वंचित राहणार आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून दीड महिन्यापासून लाभार्थ्यांना आधारकार्ड अपडेट करून त्यांची ‘डीबीटी’ पोर्टलवर नोंदीची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. यामध्ये आधारकार्डचे बँक खात्याशी केवायसी केले जात आहे; परंतु अद्यापी अनेक लाभार्थ्यांचे केवायसी झालेले नाही. जिल्ह्यात संजय गांधी योजनेचे 70 हजार 977 तर श्रावण बाळ योजनेचे 77 हजार 412 लाभार्थी आहे. त्यापैकी 90 टक्के लाभार्थ्यांनी आधारकार्डचे बँक खात्याशी केवायसी केली आहे. उर्वरीतांची केवायसी नसल्याने त्यांची पेन्शन या माहिन्यांत काढण्यात आली नसल्याचे दिसून येत आहे.
- लाभार्थ्यांनी काय करावे
ज्या बँकेत संजय गांधी अथवा श्रावणबाळ योजनेचे पैसे जमा होतात. त्या खात्यास अपडेट केलेले आधारकार्ड लिंक करून घ्यावे. त्यानंतर अपडेट आधारकार्ड आणि लिंक केलेल्या बँक खात्याची झेरॉक्स संबंधित तहसील कार्यालयात जमा करावी.
संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांचे पेन्शन अथवा अनुदान या महिन्यापासून त्यांच्या थेट बँक खात्यावर जमा होत आहे. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांचे बँक खाते केवायसी (अपडेट केलेले आधारकार्ड पेन्शन जमा होणाऱ्या खात्याशी लिंक असणे) नसेल त्यांनी तत्काळ बँक खाते केवायसी करून घेणे आवश्यक आहे.
डॉ. संपत खिलारी, उपजिल्हाधिकारी, महसूल कोल्हापूर
- ‘करवीर दक्षिण’मधील 13 हजार लाभार्थी पेन्शनपासून वंचित
आधारकार्डचे बँक खात्याशी ‘केवायसी’ असणे आवश्यकच आहे. शिवाय आधारकार्ड व्हॅलिडेशनही असणे गरजचे आहे. ज्यांचे आधारकार्ड व्हॅलिडेशन झालेले नाही, त्यांचेही पेन्शन जमा होण्यास अडचण निर्माण झाली आहे. करवीर दक्षिणमध्ये 20 हजारांपैकी 6 हजार 200 लाभार्थ्यांचेच रजिस्ट्रेशन केल्याने या महिन्याची त्यांची पेन्शन जमा झाली आहे. यापैकी 13 हजार लाभार्थ्यांचे आधार कार्ड व्हॅलिडेशन नसल्याने पेन्शन जमा होऊ शकलेली नाही. अशीच स्थिती इतर तालुक्यातही दिसून येत आहे.
- संजय गांधी योजना श्रावण बाळ
तालुका लाभार्थी संख्या लाभार्थी संख्या
आजरा 3,844 6,055
भुदरगड 3,155 4,185
चंदगड 4,063 2,526
गडहिंग्लज 6,070 4,383
गगनबावडा 474 427
इचलकरंजी 8,937 11,041
हातकंणगले 6,475 10,657
कागल 5,070 6,351
करवीर 10,321 10,105
करवीर उत्तर 4,387 1,678
पन्हाळा 3,980 2,671
राधानगरी 3,831 4,342
शाहूवाडी 2,553 1,325
शिरोळ 7,817 11,666
एकूण 70,977 77,412








