अर्थः
लेखणी, पुस्तक आणि पैसा दुसऱया हाती गेले की गेलेच! जरी ते परत आले तरी मोडलेले, खिळखिळे झालेले व खंडांत म्हणजे अनेक भागांत परत येतात. लेखणी मोडलेली, पुस्तक सैल, खिळखिळे झालेले आणि पैसा एकरकमी न येता अनेक हप्त्यांत, असे येतात.
हे सुभाषित वाचलं आणि मला एकदम एक प्रसंग आठवला. बँकेत पैसे भरायला गेल्यानंतर तिथे दोरीला बांधलेले पेन दिसले. खरं तर एक किंवा दोन रुपयाची ती वस्तू पण लिहिणारा ती बोलता बोलता आपल्याबरोबर केव्हा घेऊन जातो ते त्याचं त्याच्यासुद्धा लक्षात येत नाही आणि खूप लांब घरी गेल्यावर पश्चाताप करायची वेळ येते. अशावेळी या वस्तू का जपायला हव्यात याचं नेमकं कारण कळतं. काही जण दुसऱयाला पेन देताना त्याचे टोपण आवर्जून आपल्या हातात ठेवतात, म्हणजे पेन पुन्हा मागून घेता येते कारण आपण ज्याच्याकडे पेन मागतो तो कुठले पेन अशा भावाने आपल्याकडे बघतो. अशावेळी पेनाचे टोपण आपल्या हातात असल्याने आपण खात्रीशीरपणे त्याच्याकडून पेन परत घेऊ शकतो. पेन, छत्री, वाहन या वस्तूंना चोरीचा शिक्का कायमच बसलेला. कोणाची कुठे विसरेल, चोरीला जाईल सांगता येत नाही पण ती जाते तशा दुसऱयाही अचानकपणे आपल्या घरी येऊन दाखल होतात. कोणीतरी विसरून गेलेलं असतं आणि नंतर त्या वस्तू आपल्याच होतात. पुस्तकाचे तसंच. आपण अगदी आवर्जून परत करू असं सांगून नेलेले पुस्तक कोणीच कधीच परत करत नाही. उलट ते ज्याच्याकडे जातं त्याच्याच मालकीचं होऊन बसते. ग्रंथालयात मात्र अशा पुस्तकांची अवस्था खूप वाईट असते. दुसऱयांनी नेलेली पुस्तके बरेचदा पान दुमडून किंवा पान फाडून किंवा पानांवरती वेगवेगळय़ा खुणा करूनच परत आलेले असते. पुस्तक आपलं नाही ही जाणीव वाचणाऱयाच्या मनात कायम असतेच आणि म्हणूनच त्याची दुरावस्था होते. काही ठिकाणी तर पुस्तकांवरचं नाव खोडून ते स्वतःचं नाव घालून आपलंच कसं आहे याची जोरदार चर्चा रंगलेली असते. शेवटी मातृत्व हृदय असलेला त्या पुस्तकाचा खरा मालक त्या आपल्याच पुस्तकावर पाणी सोडतो आणि दुःखी अंतकरणाने परततो. पुस्तक मात्र सासरी आल्यावर राहतो तसे राहायला लागते. पैशाच्या बाबतीतसुद्धा अशाच घटना घडतात. एखाद्याला खूप गरज असते, अडचण असते अशा वेळेला आपण सहानुभूतीने पैसे देतो. त्या व्यक्तीची अडचण संपून बरेच दिवस झाले तरी ती व्यक्ती पैशाचे नावच काढत नाही. पैसे देणाराच शेवटी भीतभीत पैसे मागतो, अनेक नकार ऐकतो, आणि निराशा घेऊन परततो. शेवटी कवडय़ारेवडय़ा करत पैसे अनेक दिवस येत राहतात आणि शहाणपण शिकवून जातात. आपण किती प्रामाणिक आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतात, मी काही बुडवणारा आहे का? किंवा काही पळून जाणार आहे का? अशा प्रकारची वाक्मय आपल्या तोंडावर फेकतात. म्हणजे खरंतर त्याच्या अंगी नम्रता असायला हवी पण इथे उलटच होताना दिसतं. अशा वेळेला या चोरी झालेल्या वस्तूंचं किंवा सहजासहजी हातोहाती दुसऱयाकडे गेलेल्या वस्तूंचं आपल्याला नेमकं कोणतं दुःख होतं तेच कळत नाही. घेणारा हुशार का देणारा मूर्ख यातच आपण अडकून पडतो. तुमची वस्तू हातोहात स्वतःच्या नावावर राजरोस मिरवणारा जास्त हुशार ठरतो, कारण त्यांनी तुम्हाला सहज बावळट बनवलेलं असतं. त्याचंच दुःख जास्त वाटय़ाला येतं. आपल्याला आपली वस्तू चोरून नेल्यापेक्षा आपण बावळट ठरलो ह्याच जास्त दुःख झालेलं असतं.
पण काहीजणांचा हा मात्र व्यवसायच असतो. पूर्वी राजे, श्रीमंत सरदार, आताचे राजकीय पुढारी, आपण कसे सर्वगुणसंपन्न आहोत हे दाखवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करायचे. लेखनीक बसवून लिहून घ्यायचे तसाच काहीसा हा प्रकार. इथे फक्त पुस्तक, लेखणी, पैसा यांच्याबाबतीतच असे घडते असं नाही, तर ते लिहिलेले लेख, कविता, दस्तऐवज, हातो हाती आपल्या जवळच्या व्यक्तीने पळवून नेऊन स्वतःच्या नावावर खपवलं की जे वाईट वाटतं ते अभूतपूर्व असतं, त्याचं कारण वेगळं असतं. खरं तर लिहिणाऱयाची शब्द संपदा कल्पकता रात्र रात्र त्या प्रसंगाशी केलेले संवाद हे त्या लेखकाच्या मनात सतत रुंजी घालत असतात. त्याच्या अनुषंगाने लिहिलेली गाणी त्या त्या भावावस्था घेऊन जगत असतात. अगदी वैभवाने गुणगुणत इकडून तिकडे फिरत असतात, मिरवत असतात. अशावेळी आपलं हे सगळं लेखन, चिंतन, संदर्भ किंवा शब्द चोरीला गेल्याचे दुःख त्या लेखकाच्या मातृ हृदयाला प्रचंड मोठं वेदना देणार ठरतं. पण ते स्वतःच्या नावावर मिरवणारा मात्र आपण केवढं मोठं मैदान मारलं अशा थाटात फुशारकी मारत, छाती फुगवून फिरत असतो. पण अर्थातच त्याचं हे वरवरचं पोकळपण लवकरच समाजाच्या समोर येतंच. कारण लिहिणं आणि लिहून घेणं या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. लिहिणारा स्वतःची अभिव्यक्ती, स्वतःची कल्पकता तिथे मनापासून वापरत असतो आणि लोकांच्या मनात लोकांसमोर काय चित्र उभं राहील याची अनुभूती आधीच घेत असतो. त्यामुळेच त्याची कलाकृती सशक्त बनते आणि लोकांच्या स्मरणात कायमच जागून राहते.








