वृत्तसंस्था/ इंदूर
2023 च्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवसाअखेर वेगवान गोलंदाज आकाशदीपने मिळविलेल्या 5 बळींच्या जोरावर बंगाल संघाने विद्यमान विजेत्या मध्यप्रदेश विरुद्ध आपली स्थिती अधिक भक्कम केली आहे. आकाशदीपने शुक्रवारी 42 धावात 5 गडी बाद केले.
या उपांत्यफेरीच्या सामन्यात बंगालने पहिल्या डावात 438 धावा जमविल्या होत्या. सुदीपकुमार घरमी आणि अनुस्तुप मुजुमदार यांनी शानदार शतके तर पोरलने अर्धशतक झळकविले. त्यानंतर मध्यप्रदेशने 2 बाद 56 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. पण आकाशदीपच्या भेदक गोलंदाजीसमोर मध्यप्रदेशचा पहिला डाव 79 षटकात 170 धावात आटोपला. मध्यप्रदेश संघातील सरनेश जैनने 169 चेंडूत 5 चौकारांसह 65 धावा जमविल्या. तर शुभम शर्माने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 99 चेंडूत 4 चौकारांसह 44 धावा केल्या. मध्यप्रदेशच्या इतर फलंदाजांना अधिक धावा जमविता आल्या नाहीत. बंगालच्या अचूक गोलंदाजीसमोर मध्यप्रदेशचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. यश दुबेने 2 चौकारांसह 12, हिमांशू मंत्रीने 1 चौकारासह 23, यश दुबेने 2 चौकारांसह 12 धावा केल्या. बंगालतर्फे आकाशदीपने भेदक गोलंदाजी करत 5 गडी बाद केले. शहबाज अहमदने 30 धावात 2 तर मुकेशकुमार, पोरल यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. बंगालने मध्यप्रदेशवर पहिल्या डावात 268 धावांची भक्कम आघाडी मिळवून आता हा संघ निर्णायक विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. उपलब्ध असतानाही बंगालने मध्यप्रदेशला फॉलोऑन देण्याचे टाळले आणि त्यांनी दुसऱया डावात दिवसअखेर 29 षटकात 2 बाद 59 धावा जमविल्या. करनलालने 2 चौकारांसह 19 तर ईश्वरनने 2 चौकारांसह 17 धावा केल्या. घरमी 12 धावांवर तर मुजुमदार 9 धावांवर खेळत आहेत. मध्यप्रदेशतर्फे कुमार कार्तिकेय आणि एस. जैन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. बंगालने एकूण 327 धावांची बढत मिळविली आहे.
संक्षिप्त धावफलक
बंगाल प. डाव 141.3 षटकात सर्वबाद 438 (घरमी 112, मुजुमदार 120, पोरल 51, कार्तिकेय 3 बळी, गौरव यादव आणि अगरवाल प्रत्येकी 2 बळी, आवेश खान, एस. जैन प्रत्येकी 1 बळी), मध्यप्रदेश प. डाव 79 षटकात सर्वबाद 170 (सरनेश जैन 65, मंत्री 23, दुबे 12, शुभम शर्मा नाबाद 44, आकाशदीप 5-42, शहबाज अहमद 2-30, मुकेशकुमार आणि ईशान पोरल प्रत्येकी 1 बळी). बंगाल दु. डाव 29 षटकात 2 बाद 59 (करनलाल 19, ईश्वरन 17, घरमी खेळत आहे 12, मुजुमदार खेळत आहे 9, कार्तिकेय आणि जैन प्रत्येकी 1 बळी).









