वृत्तसंस्था/ चेन्नई
सध्या सुरू असलेल्या आयसीसीच्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या सामन्यात पाक संघाला षटकांची गती राखता न आल्याने पाकच्या खेळाडूंना 20 टक्के दंड करण्यात आला आहे.
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघाला या सामन्यात निर्धारित वेळेत आपली षटके पूर्ण करता आली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी या संघाला आयसीसीच्या नियमाचा भंग केल्याबद्दल दंड ठोठावला आहे. या स्पर्धेत पाक संघाने आतापर्यंत 6 पैकी 4 सामने गमाविल्याने त्यांचे उपांत्य फेरीसाठीचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे या संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधनातील 20 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागले.









