वृत्तसंस्था/ दुबई
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सेंच्युरियन येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारतीय संघाला गोलंदाजी करताना षटकांची गती राखता न आल्याने आयसीसीने भारतीय संघाला दंड ठोठावला आहे. या कारणामुळे शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला 2 गुण गमवावे लागले आहेत.
आयसीसीच्या या निर्णयामुळे भारतीय संघातील खेळाडूंना मिळणाऱ्या मानधन रकमेतील 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना केवळ तीन दिवसात जिंकला. आयसीसीच्या ईलाईट पंच पॅनेलचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी भारतीय संघाला हा दंड ठोठावला आहे. निर्धारित कालावधीत भारतीय संघाकडून दोन षटके कमी राहिल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसीने दिलेल्या या निर्णयाच्या सुनावणीसमोर आपला गुन्हा मान्य केला आहे. दोन षटके राहिल्याने प्रत्येक षटकाला आयसीसीने 1 गुण वजा केला असल्याने भारतीय संघाचे दोन गुण कमी झाले आहेत. पहिल्या कसोटीतील मैदानावरील पंच पॉल रायफेल, लेंगटन रुसेरी, तृतीय पंच एहसान रझा आणि चौथे पंच स्टिफन हॅरीस यांनी या सामन्यानंतर आपल्या अहवालामध्ये भारतीय संघावर हा आरोप ठेवण्यात आला होता. पहिल्या कसोटीतील पराभवामुळे भारतीय संघाला विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुण तक्त्यातील आपले अग्रस्थान गमवावे लागले आहे. आता या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे.









