वृत्तसंस्था / दुबई
अफगाण क्रिकेट संघातील अष्टपैलु गुलबदीन नईबला आयसीसीच्या शिस्तपालन नियमाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरुन दंड करण्यात आला आहे. झिम्बाब्वे विरुद्धच्या शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात नईबकडून हा गुन्हा घडला.
अफगाणने शुक्रवारच्या सामन्यात झिम्बाब्वेचा 50 धावांनी पराभव करुन 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. झिम्बाब्वेच्या डावातील 11 व्या षटकात रशिद खानच्या गोलंदाजीवर झिम्बाब्वेच्या मुसीकिवाविरुद्ध पायचीतचे जोरदार अपिल करण्यात आले. पण पंचांनी ते फेटाळले. यावेळी नईबने पंचांच्या या निर्णयाविरुद्ध नाराजी व्यक्त करताना संतप्त होऊन विक्षिप्त हावभाव केले. या कारणास्तव आयसीसीच्या शिस्तपालन समितीने त्याला मिळणाऱ्या सामना मानधनातील 15 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे.









