वृत्तसंस्था/ लंडन
नुकत्याच येथे झालेल्या 2023 च्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागणाऱ्या सर्बियाच्या द्वितीय मानांकित नोव्हॅक जोकोविचला अंतिम सामन्यावेळी मैदानावर टेनिस रॅकेट भिरकटल्याने त्याला स्पर्धा आयोजकांनी दंड ठोठावला आहे.
या स्पर्धेतील अंतिम सामन्यात स्पेनच्या 20 वर्षीय अॅलकॅरेझने 5 सेट्समधील लढतीत जोकोविचचा पराभव करून विम्बल्डन चषकावर आपले नाव पहिल्यांदाच कोरले. या पराभवामुळे जोकोविचला या स्पर्धेत विक्रमी आठव्यांदा जेतेपदाने हुलकावणी दिली. या अंतिम सामन्यात खेळताना आपल्याकडून वारंवार चुका होत असल्याने जोकोविचला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्याने आपली टेनिस रॅकेट भिरकटली. तत्पुर्वी या सामन्यावेळी पहिल्यांदा रॅकेट फेकल्याने पंचांनी त्याला ताकीद दिली होती आता विम्बल्डन स्पर्धा आयोजकांनी त्याला 6117 पौंड्सचा दंड ठोठावला आहे. जोकोविचला उपविजेतेपदाबरोबरच 1175 दशलक्ष पौंड्सची रक्कम बक्षीसादाखल मिळाली असून या रकमेतून 6116 पौंड्सची रक्कम वजा करण्यात आली.









