व्यापारी, उद्योजकांचा भव्य मोर्चा : इलेक्ट्रीक दुचाकीची काढली अंत्ययात्रा : वीज बील कमी करा अन्यथा, राज्यव्यापी बंदचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
वीज बिलदरामध्ये भरमसाट वाढ झाली. यामुळे सर्वसामान्य जनतेसह उद्योजक, व्यापारी याचबरोबर शहरातील व ग्रामीण भागातील लहान मोठ्या व्यवसायिकांचेही कंबरडेच मोडले आहे. त्या विरोधात बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स तसेच विविध औद्योगिक व्यापारी संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून वाढीव वीजबिल कमी करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन तीव्र निषेध नेंदविण्यात आला आहे. जर वीजबिल कमी करण्यात आले नाही तर राज्यव्यापी बंदची हाक दिली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
वीजबिलांमध्ये चारपटीने वाढ झाली. त्यामुळे जनताच मेटाकुटीला आली आहे. ही बिले भरणे अवघड आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे वीजबिले द्यावीत, अशी मागणी करण्यात आली आहे. मोठ्या उद्योजकांबरोबरच लहान आणि मध्यम उद्योजक देखील अडचणीत आले आहेत. एक तर मंदीचे सावट व्यवसायावर असताना अचानक वीजदर वाढीमुळे सर्वच व्यवसाय संकटात आले आहेत. यामुळे आता बेरोजगारीही वाढणार आहे. तेव्हा सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि वाढविलेली वीजबिले कमी करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्यापारी आणि उद्योजकांचा भव्य मोर्चा
सर्वसामान्य जनतेचे जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे वीजबिल भरणे कठीण आहे. यासाठी सरकारने सारासार विचार करुन वाढीव वीजबिल कमी करावे, असे या निवेदनात म्हटले आहे. बेळगाव बंद करुन व्यापारी आणि उद्योजकांनी हा भव्य मोर्चा काढला. यावेळी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली. धर्मवीर संभाजी चौक येथून मोर्चाला सुरूवात झाली. कॉलेज रोडमार्गे कित्तूर चन्नम्मा चौक येथे मोर्चा आल्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी रास्तारोको करुन घोषणाबाजी देण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील हे अनुपस्थित होते. त्यामुळे व्यापारी तसेच उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांशीच आम्हाला चर्चा करायची आहे, असा हट्ट धरला.
त्यामुळे पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना याची माहिती दिली. काही वेळानंतर जिल्हाधिकारी मोर्चासमोर आले. त्यांनी निवेदन स्वीकारले व सरकारला पाठविण्याचे आश्वासन दिले. याचबरोबर वीजबिल दराबाबत पाठपुरावा करु, असे आश्वासन त्यांनी दिले.
इलेक्ट्रीक बाईकची प्रतिकात्मक अंत्ययात्रा
वाढीव वीजबिल विरोधात साऱ्यांचाच आक्रोश मोठा होता. उद्योजकांनी तर तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे. इलेक्ट्रीक दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा या मोर्चामधून काढण्यात आली होती. त्यामुळे साऱ्यांचेच लक्ष या अंत्ययात्रेकडे होते. जवळपास 80 ते 90 किलो वजनाची इलेक्ट्रीक बाईक तिरडीवर बांधण्यात आली. धर्मवीर संभाजी चौकपासूनच अचलून तिला हार घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणण्यात आली. वीजच महाग झाली तर इलेक्ट्रीक बाईक चालवायची कशी? असा संदेश या मोर्चामध्ये देण्यात आला.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदन घेतले. त्यानंतर चेंबरच्या काही मोजक्या पदाधिकाऱ्यांना बोलावून घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या मोर्चाचे नेतृत्व बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, उपाध्यक्ष प्रभाकर नागरमुनवळ्ळी, संजीव कत्तीशेट्टी यांनी केले होते. यावेळी स्वप्नील शहा, आनंद देसाई, उद्योजक आणि राजकीय नेते शंकरगौडा पाटील, महादेव चौगुले, कृष्णा भट्ट, अजय पै, शरद पाटील, सुनील नाईक, रमेश देसूरकर, सचिन सबनीस यांच्यासह सराफ असोसिएशनचे, बेकर्स असोसिएशन, मराठा रजक समाज, ऑटोमोबाईल असोसिएशन, लॉन्ड्री ओनर्स असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, लघु उद्योजक संघटना, फौंड्री उद्योजक, यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच व कार्यकर्ते, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.









