वृत्तसंस्था/ दुबई
भारतीय क्रिकेट संघ सध्या विंडीजच्या दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारत आणि विंडीज या दोन्ही संघांना षटकांची गती राखता न आल्याने आयसीसीने दंड ठोठावला आहे. या सामन्यात विंडीजने भारताचा पराभव करत विजयी सलामी दिली आहे.
या पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाज निर्धारित कालावधीत आपली षटके पूर्ण करू शकले नाहीत त्यामुळे आयसीसीने या संघाला दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय गोलंदाजांनी निर्धारित वेळेपेक्षा अधिक कालावधीत एक षटक टाकले होते. आता भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधन रकमेतील पाच टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. तर विंडीज संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधन रकमेतील 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागेल. या सामन्यात विंडीजच्या गोलंदाजांना निर्धारित वेळेत आपली षटके पूर्ण करता आली नाहीत. त्यांनी 2 षटके जादा वेळेत पूर्ण केली होती. सदर माहिती आयसीसीच्या इलाईट पंच पॅनेलचे रिची रिचर्डसन यांनी दिली.









