लांजा :
माचाळ येथे पर्यटनासाठी येणाऱ्या मद्यधुंद पर्यटकांची हुल्लडबाजी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांना होणारा मनस्ताप थांबताना दिसत नाही. अशातच ग्रामस्थांनी केलेल्या सततच्या तक्रारीमुळे रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास लांजा पोलिसांनी माचाळकडे जाणाऱ्या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांची कसून तपासणी करून 19 पर्यटकांवर दंडात्मक कारवाई केली.
माचाळला येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या ठिकाणी असलेली हिरवीगार झाडी, नागमोडी वळणाचा रस्ता, परिसरात पूर्णपणे धुके आणि थंडगार वातावरण यामुळे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. एकीकडे निसर्गसौंदर्याने नटलेला माचाळ पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे मात्र मद्यधुंद पर्यटकांचा धिंगाणाही वाढला आहे.
मद्यधुंद पर्यटक हुल्लडबाजी करत निसर्गसौंदर्याला गालबोट लावत असल्याने काही दिवसांपूर्वी पोलिसांच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच ग्रामपंचायतीच्यावतीने जागोजागी सूचनाफलक लावण्यात आले आहेत. तरीही मद्यधुंद पर्यटकांचा धुडगूस थांबत नाही. या रोजच्या मनस्तापामुळे ग्रामस्थांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. अशा वारंवार निसर्गसौंदर्याला बाधा आणणाऱ्या पर्यटकांच्या येणाऱ्या तक्रारींमुळे रविवारी लांजा पोलिसांच्या पथकाने माचाळ येथे जाणाऱ्या पर्यटकांची माचाळला जाण्यापूर्वी गस्त घालत कसून तपासणी केली. दुचाकीस्वारांसह सर्वच वाहनांची तपासणी करत मद्य नेण्यापासून रोखण्यात आले. त्याचप्रमाणे बेशिस्त पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
संबंधित ग्रामपंचायतीने त्या ठिकाणी जागोजागी सूचनाफलक लावले असतानाही मद्य सेवन करून धिंगाणा घालणे, अश्लील चाळे करणे आणि अर्धवट कपड्यांवर नृत्य करणे, हे राजरोसपणे सुरू असते. त्यामुळे अशा कृत्याने आलेल्या महिला पर्यटकांचा मनास लज्जा उत्पन्न होऊन हिरमोड होतो. याचे परिणाम कौटुंबिक पर्यटकांवर होऊन पर्यटक घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रविवारी माचाळ येथे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. तसेच दंडात्मक कारवाई केल्यानंतर येथून पुढे माचाळ परिसरात मद्यधुंद पर्यटकांवर कठोर कारवाई केली जाईल, अशा सक्त सूचना पोलिसांच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
- प्रशासनाने लक्ष घालावे
पर्यटनस्थळ म्हणून नावारुपास येत असलेल्या निसर्गरम्य माचाळच्या निसर्गसौंदर्याला बाधा येऊ नये, यासाठी प्रशासनाने लक्ष घालणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, प्रदूषण होऊ नये व पशु-पक्षांनाही त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच मद्यवाहतूक रोखणे, उघड्यावर मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई करणे यासाठी नियमित गस्त घालणे, पाळत ठेवणे या विविध बाबी अपेक्षित असून असे केल्यास माचाळच्या निसर्गसौंदर्याला बाधा आणणाऱ्यांवर अंकुश ठेवता येईल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.








