वृत्तसंस्था/ बिलेम (ब्राझील)
ब्राझील आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू नेमार ज्युनिअरने ब्राझीलचे फुटबॉल सम्राट दिवंगत पेले यांचा विक्रम मोडीत काढला. आता ब्राझीलतर्फे विविध स्पर्धांमध्ये सर्वाधिक गोल नोंदविण्याचा विक्रम नेमार ज्युनिअरच्या नावावर राहील.
आगामी विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या पात्र फेरीतील बोलीव्हिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ब्राझीलचे प्रतिनिधीत्व करताना नेमार ज्युनिअरने दोन गोल नोंदविले. नेमारने 61 व्या मिनिटाला ब्राझीलचे खाते उघडले. नेमारचा हा गोल पेलेचा विक्रम मागे टाकणारा ठरला. नेमारचा हा आंतरराष्ट्रीय सामन्यातील 78 वा गोल ठरला. त्यानंतर नेमारने या सामन्यात आपला दुसरा गोल केला. रॉड्रीगोने या सामन्यात दोन गोल केले. ब्राझीलने हा सामना 5-1 अशा गोलफरकाने जिंकून अ गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे. आता ब्राझीलचा या स्पर्धेतील पुढील सामना येत्या बुधवारी पेरू संघाविरुद्ध होणार आहे.









