वृत्तसंस्था/ अॅडलेड
अमेरिकेच्या द्वितीय मानांकित जेसिका पेगुलाने आपल्याच देशाच्या बर्नार्डा पेराचा पराभव करून अॅडलेड इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
पेगुलाने पेरावर 4-6, 6-2, 6-3 अशी मात केली. पेराला पात्रता फेरीत लकी लुजर म्हणून मुख्य स्पर्धेत स्थान मिळाले होते. पेराने नंतर पहिल्याच फेरीत माजी द्वितीय मानांकित पॉला बेडोसाला पराभवाचा धक्का दिला. पेगुलाची पुढील लढत रशियाच्या अॅनास्तेशिया पावलुचेन्कोव्हाशी होईल. पावलुचेन्कोव्हाने आपल्याच देशाच्या कॅटरिना सिनियाकोव्हावर 2-6, 6-3, 6-2 अशी मात करून आगेकूच केली. येत्या रविवारपासून ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा सुरू होणार असून तयारीसाठी त्याआधीची ही शेवटची स्पर्धा आहे.
मेलबर्नमध्ये सिनरची आगेकूच
मेलबर्नमध्ये झालेल्या कूयाँग क्लासिक प्रदर्शनीय सामन्यात इटलीच्या यानिक सिनरने मार्क पोलमन्सचा 6-4, 6-0 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियन ओपनआधी होणाऱ्या अन्य स्पर्धांऐवजी सिनरने या प्रदर्शनीय स्पर्धेत खेळण्यास पसंती दिली. त्याच्याप्रमाणे होल्गर रुने व अँडी मरेही या स्पर्धेत खेळत आहेत. सिनर या मोसमातील पहिल्याच सामन्यात विजय मिळवित चांगली सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी तुरिन येथे झालेल्या एटीपी फायनल्स स्पर्धेत सिनरने अग्रमानांकित नोव्हॅक जोकोविचला पराभवाचा धक्का दिला होता. त्यानंतर एकाच आठवड्याने झालेल्या डेव्हिस चषक अंतिम लढतीत त्याने इटलीला जेतेपद मिळवून देत वर्षाची अखेर केली होती. मोसमाच्या अखेरीस झालेल्या बीजिंग व व्हिएन्ना येथील स्पर्धांही त्याने जिंकल्या, त्यात कार्लोस अल्कारेझ, डॅनील मेदवेदेव्ह यांच्यावरील मिळविलेल्या विजयांचा समावेश होता.
एलिस मर्टेन्स उपांत्यपूर्व फेरीत
होबार्ट इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित एलिस मर्टेन्सने उपांत्यपूर्व फेरी गाठताना अॅना कॅरोलिना श्मिडलोव्हाचा 6-2, 6-3 असा पराभव केला. तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्यासाठी ती प्रयत्नशील आहे. बेल्जियमच्या मर्टेन्सने याआधी 2017 व 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तिची पुढील लढत डचच्या अनुभवी अरांत्जा रुसशी होणार आहे.









