वृत्तसंस्था/ चार्लस्टन (अमेरिका)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या चार्लस्टन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत तृतीय मानांकित जेसिका पेगुलाने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना बेडोसाचा पराभव केला. त्याचप्रमाणे बेलिंडा बेन्सिकने उपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकून शेवटच्या चार खेळाडूत स्थान मिळविले आहे. पेगुला आणि बेन्सिक यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.
या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पेगुलाने बेडोसाचा 6-3, 7-6 (8-6) असा पराभव केला. दुसऱ्या एका उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत बेन्सिकने अलेक्संड्रोव्हावर 6-3, 6-3 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. बेन्सिक या स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे. पेगुला आणि बेडोसा यांच्यातील हा सामना जवळपास दोन तास चालला होता.









