बेंगळूर/प्रतिनिधी
‘पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने देशात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पेगॅससचा वापर करून सरकार पडल्याच्या माहितीनंतर कर्नाटक कॉंग्रेसच्या नेत्यांनी गुरुवारी सकाळी विधान सौध बाहेर निषेध केला. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या वतीने हा निषेध करण्यात आला.
दरम्यान, कर्नाटकातील निजद-काँग्रेस युतीचे सरकार पाडण्यासाठी ‘ पेगॅसस’ सॉफ्टवेअरचा वापर झाल्याचा, असा दावा ‘द वायर’ या वृत्तसंस्थेने केला आहे. या खळबळजनक दाव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून आज काँग्रेसच्या वतीने या घटनेचा निषेध केला. २०१९ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे फोन टॅपिंग करण्यासाठी पेगाससचा वापर झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. निजद-काँग्रेस युतीच्या काळात प्रमुख नेत्यांच्या फोनवरील संभाषणांवर नजर ठेवण्यात आली होती, असा दावाही या वृत्तसंस्थेने केला आहे.