आमदार प्रवीण आर्लेकर यांची चांदेल पाणी प्रकल्पाला भेट : पेडणे मतदारसंघातील समस्या सोडविण्याची मागणी

पेडणे : पेडणे मतदारसंघात सध्या पाण्याची तीव्र समस्या असून शुक्रवारी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकणी त्यांनी चांदेल येथील प्राणी प्रकल्पाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांना जाब विचारत धारेवर धरले. आपल्या मतदारसंघातील पाण्याच्या समस्याबाबत आपण गप्प राहणार नाही. पेडणेतील जनतेला पाण्यासदंर्भात कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, त्यासाठी तात्काळ उपाय योजना करा तसेच अतिरिक्त टँकरची सोय करून पाणीपुरवठा करा, अशी सूचना आमदार आर्लेकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी पेडणे पाणी विभागाचे अभियंता सोमा नाईक, साहाय्यक अभियंता संदीप मोजरकर, चांदेल पाणी प्रकल्पाचे अधिकारी बालाजी फडते, चांदेल हसापूर पंचायतीचे सरपंच तथा पेडणे भाजप मंडळाचे अध्यक्ष तुळशीदास गावस, कासारवर्णे सरपंच नवनाथ नाईक, पंच बाळा शेटकर, आनंद गावस, प्रकाश गावस, रतन गावस, सुधीर मळीक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
अन्यथा गप्प बसणार नाही!
एप्रिल व मे महिना अजून यायचा आहे. मार्च महिन्यातच एवढी समस्या होत असेल तर एप्रिल मे महिन्यात कशा पद्धतीने उपाययोजना करणार? असाही प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांना विचारला. मोपा विमानतळ आणि आयुष्य इस्पितळ प्रकल्पाला पाणी वळवल्याने ही मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आपल्याला आपली जनता महत्त्वाची असून त्यासाठी योग्य ती उपाय योजना करा, अन्यथा आपण गप्प राहणार नाही, असा इशाराही यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला. वीजपुरवठा खंडित होणार याची पूर्वकल्पना असताना नियोजन करणे गरजेचे होते. तसे होत नसल्याने त्या समस्या आता निर्माण होत आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्याने नियोजित आराखडा तयार करून याबाबत उपाययोजना करावी, असे निर्देशही यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नवीन 15 एम.एल.डी पाणी प्रकल्पाचाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सदर प्रकल्प लवकरच सुरू होणार असून यासाठी दोन महिने या प्रकल्पाला लागणार असल्याचे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पाला सुमारे सहा महिने आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले. दरम्यान, याबाबत खात्याचे मंत्री नीलेश काब्राला तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेडणेच्या पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पेडण्यातील पाणी समस्या प्राधान्याने सोडवावी, असे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.









