मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची अपेक्षा : केएलई येथे भारतीय बालरोगतज्ञ संघटनेची परिषद
प्रतिनिधी / बेळगाव
बालरोगतज्ञांनी बालकांच्या आरोग्याबाबत पालकांना सतत मार्गदर्शन केले पाहिजे, अशी अपेक्षा महाराष्ट्राचे पशुसंगोपन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केली.
काहेर विद्यापीठाच्या जेएनएमसीमधील
पिडीऍट्रिक्स विभाग, कर्नाटक राज्य अकॅडमी ऑफ पिडीऍक्ट्रिक्स तसेच याच संस्थेची बेळगाव शाखा, मेडिकोलिगल कर्नाटक ग्रुप यांच्यावतीने 36 वी भारतीय बालरोगतज्ञ संघटनेची परिषद केएलईच्या शताब्दी सभागृहात झाली. या परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
व्यासपीठावर काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, आयएपीचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार, डॉ. उपेंद्र किंजवडेकर, डॉ. पियुष गुप्ता, डॉ. विनीत सक्सेना, डॉ. संतोष, डॉ. व्ही. के. गोयल आदी होते. आयएपी कर्नाटक शाखेच्या अध्यक्षा डॉ. रूपा बेल्लद यांनी स्वागत केले. हॉस्पिटलचे संचालक डॉ. व्ही. डी. पाटील यांनी राधाकृष्ण विखे-पाटील यांचा परिचय करून दिला.
राधाकृष्ण यांनी केएलईच्या प्रगतीसाठी डॉ. कोरे यांनी घेतलेल्या परिश्रमांची प्रशंसा केली. ग्रामीण भागातील बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. डॉ. कोरे यांनी थॉमस जेफर्सन विद्यापीठाबरोबर बाल आणि महिला विकास विभाग करत असलेल्या संशोधनाबद्दल समाधान व्यक्त केले. आयएपीच्या सचिव डॉ. मनीषा भांडणकर यांनी अहवाल सादर केला. आयएपीचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार यांनी माहिती दिली. डॉ. तन्मया मेटगुड यांनी आभार मानले. या परिषदेला देशातून 800 हून अधिक बालरोगतज्ञ उपस्थित होते.