घोटमड- उसगाव येथील घटना : मयताचे शिर धडापासून झाले वेगळे; ट्रकचालकास अटक
फोंडा : फोंडा-बेळगाव महामार्गावर खुर्साकडे-उसगांव येथे काळजात धडकी भरणारा भीषण अपघात होऊन त्यात निष्पाप पादचाऱ्याचा बळी गेला. धोकादायक वळणावरील अरूंद रस्त्यावर मालवाहू ट्रकने पादचाऱ्याला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. जागीच गतप्राण झालेल्या पादचाऱ्याची काही वेळेनंतर आनंद धर्मा नाईक (57, रा. घोटमड, उसगांव) अशी ओळख पटली.हा अपघात एवढा भीषण होता की या धडकेत पादचाऱ्याचे शरीर छिन्नविछिन्न अवस्थेत अपघाताच्या स्थळावर विखुरले होते, तर त्याचे डोके सुमारे 1 किलोमीटर अंतरावर तिस्क उसगांव येथील एमआरएफ कंपनीजवळ आढळले. अपघाताची घटना ‘हिट अॅन्ड रन’ म्हणून नोंद करण्यात आली आहे. फोंडा पोलिसांनी दोन तासांच्या आत छडा लावत अपघातास कारणीभूत वाहनाचा शोध घेण्यात यश मिळविले.
वळणावरील अरूंद रस्त्यावर चालकाचे वेगावर नियंत्रण नसल्याने अपघात 
भरधाव वेगाने हाकणाऱ्या मालवाहू ट्रकचालकाचे वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. वळणावरील अरूंद रस्ता असल्याने वाहनचालकांनाही या रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे यापूर्वीही अनेक अपघात घडलेले आहेत. महामार्गाचे काम जलदगतीने सुरू करून पूर्ण केल्यानंतर अपघातावर नियंत्रण येईल, असे येथील स्थानिक रहिवासी वासुदेव गावडे यांनी सांगतिले.
कार अपघातात युवक ठार
दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलजवळ झालेल्या कारच्या स्वयं अपघातात 24 वर्षीय युवक ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पणजी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. दोन्ही जखमींना गोमेकॉत दाखल केले. गोमेकॉत उपचार घेत असताना कारचालकाचे निधन झाले.ठार झालेल्या कारचालकाचे नाव यचिकेश विश्वनाथ शिरोडकर (24) असे असून त्याच्या सोबत कारमध्ये असलेल्या सहप्रवाशाचे नाव अकितेश पाड्डेकर असे असून (दोघेही कुडका, तिसवाडी येथील आहेत.) अकितेश गोमेकॉत उपचार घेत आहे. दोन्ही युवक जीए-07-0767 क्रमांकाची माऊती सेलेरिओ कार घेऊन कुडका गोवा विद्यापीठमार्गे दोनापावलाच्या बाजूने जात होते. मणिपाल हॉस्पिटल जवळ पोचले असता चालकाचा तोल गेला आणि कारने रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला धडक दिली. शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पणजी पोलीस पुढील तपास करीत आहेत.









