चिपळूण :
शहरातील काविळतळी येथे मंगळवारी सायंकाळी 7.30 वाजता इनोव्हा कारच्या धडकेने पादचारी प्रौढ ठार झाला. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश बंडू कलकुटकी (50, गांधीनगर-बहादूरशेखनाका) असे ठार झालेल्याचे तर अभिजित जयंद्रथ खताते (35, खेर्डी) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
अभिजित हा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते यांचा मुलगा आहे. तो इनोव्हा कार घेऊन खेर्डीकडे जात असताना काविळतळी येथे या कारची कलकुटकी यांना धडक बसली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांसह विविध पक्षाच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे काविळतळी परिसरात मोठी गर्दी झाली होती.
त्यानंतर कलकुटकी यांचा मृतदेह कामथे रुग्णालयात नेण्यात आला. यानंतर सर्वजण पोलीस ठाण्यात आले. त्यामुळे येथेही मोठी गर्दी झाली. या अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. तसेच अभिजित याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश जाधव करीत आहेत. या अपघातात ठार झालेल्या कलकुटकी यांच्यावर बुधवारी रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खताते यांच्या मालकीच्या डंपरची खेर्डी येथे एका दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील विवाहिता ठार झाली. त्या पाठोपाठ त्यांच्याच गाडीचा झालेला हा दुसरा अपघात आहे.








