लोणंद :
लोणंद येथील शिरवळ चौकात रस्त्याचे कडेला उभे असलेल्या असिफ जहांगीर बागवान (वय 46 वर्षे रा. उमाजी नाईक चौक रविवार पेठ फलटण) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी रात्री उशिरा पाऊणे बाराच्या सुमारास घडला.
असिफ बागवान हे शिरवळ चौकामध्ये रस्त्याच्या कडेला उभे असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले परंतु त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यास व उजव्या पायास गंभीर दुखापत झाली होती.
अपघातानंतर वाहन चालक हा पळून गेला. या वाहन चालकाचा शोध लोणंद पोलीस घेत आहेत. फिर्याद सिद्दिक रियाज बागवान यांनी लोणंद पोलिसात दिली आहे. यापुढील तपास लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले करीत आहेत.








