या हंगामातील सर्वेक्षणाचे काम थांबविले : जिल्ह्यात 1492 पीआर कर्मचारी
बेळगाव ; पीक सर्वेक्षण केलेल्या कर्मचाऱ्यांना (पीआर) सरकारकडून गौरवधन देण्यात आला नसल्याने सदर कर्मचाऱ्यांनी या हंगामातील पीक सर्वेक्षण काम थांबविले आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणताच उपयोग झाला नसल्याची प्रतिक्रिया पीआर कर्मचाऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. यासाठीच जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम थांबविण्यात आला असल्याचे पीआर कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये 1492 पीआर कर्मचारी आहेत. गेल्या उन्हाळी हंगामातील एप्रिल-मे दरम्यानच्या पिकांचा सर्वेक्षण करून सरकारला अहवाल देण्यात आला आहे. मात्र या कामाचा मोबदला देण्यात येणार नसल्याने पीआर कर्मचाऱ्यांनी नुकताच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडल्या होत्या. कामाचा मोबदला त्वरित देण्यात यावा, यासाठी निवेदन देण्यात आले होते. ही बाब कृषी अधिकाऱ्यांसह तालुकास्तरीय संबंधित अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. मात्र याची दखल घेण्यात आलेली नाही. यासाठी या मान्सून हंगामातील पिकांचा सर्वेक्षण करण्याचे काम थांबविण्यात आले असल्याचे पीआर कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
वर्षामध्ये तीनवेळा पिकांचा सर्वेक्षण केला जातो. यासाठी प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण करणे गरजेचे आहे. जीपीएस प्रणाली वापरण्यात येत असल्याने प्रत्यक्ष शेत जमीनीत जाणे गरजेचे आहे. त्यामुळे ऊन, पाऊस याची तमा न बाळगता सर्वेक्षणाचे काम करावे लागते. संबंधित शेतातील सर्व्हे नंबरमध्ये जाऊन फोटो घेऊन आपलोड करावा लागतो. कष्टाचे काम असूनदेखील सरकारकडून सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या अनेक महिन्यापासून थकवले आहे. त्यामुळे सर्वेक्षण कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. सरकारने याची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. याबरोबरच कायमस्वरुपी सेवेत समावून घेण्यात यावे, ओळखपत्र देण्यात यावे, कामावर असताना दुर्घटना घडल्यास कुटुंबीयांना भरपाई द्यावी, सुरक्षा किट वितरीत करावेत, आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. मात्र याबाबत कोणतीच दखल घेतली नसल्याची तक्रार पीआर कर्मचाऱ्यांकडून होत आहे.









