‘गांधी भारत’ कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण : बेळगावकरांनी दाखविली माणुसकी
प्रतिनिधी/ बेळगाव
शंभर वर्षांपूर्वी बेळगाव शहर हे एका ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार ठरले होते. ही घटना होती काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन. 26-27 डिसेंबर 1924 रोजी बेळगावला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. महत्त्वाची बाब म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या निमित्ताने बेळगावमध्ये त्यांचे वास्तव्य होते. अधिवेशनाच्या अनेक सुरस, रंजक आणि तितक्याच प्रबोधनपर कहाण्या आजही सांगणारी मंडळी आहेत. सध्या राज्यामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर आहे. अर्थातच या राष्ट्रीय अधिवेशनाचा शतकपूर्ती सोहळा अत्यंत अपूर्वाईने साजरा करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरविले आणि त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. कोणत्याही राजकीय पक्षांचे कार्यक्रम म्हणजे बेळगावकरांना वेठीलाच धरले जाते. या अधिवेशनापूर्वीच सरकारचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगावला झाले आणि साधारण पंधरा ते वीस दिवस बेळगावकरांना वाहतूक कोंडी, रस्ते बदल यांचा सामना करावा लागला.
त्यापाठोपाठ काँग्रेसने राष्ट्रीय अधिवेशनाच्या शतकपूर्ती सोहळ्याचा घाट घातला. या अधिवेशनासाठी पक्षाने जोरदार तयारी केली. मुळात पक्षाचे अस्तित्व अधिक दृढ करण्यासाठी, उणिवा शोधून त्या दूर करून एकजूट घट्ट करण्यासाठी हे अधिवेशन काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचेच होते. बेळगावला अधिवेशन होणार, हे जाहीर झाले तरी अनेक पक्षांचे अनेक कार्यक्रम याप्रमाणे हाही एक असेल असेच वाटले होते. तथापि, अधिवेशनाच्या निमित्ताने पक्षाने बेळगाव शहराचा जो कायापालट केला तो पाहता शहरवासीय अचंबित झाले. शहरात सर्वत्र महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध तसेच वेगवेगळ्या देवदेवतांच्या प्रतिमा विद्युत रोषणाईने झळकू लागल्या आणि एका वेगळ्याच कलाकृतींचा अनुभव बेळगाववासियांनी अनुभवला. शहरातील चौका-चौकांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली. महात्मा गांधी यांचे एक स्मारक शिवाजी उद्यानमध्ये आहे. सर्व महत्त्वाच्या राष्ट्रीय व्यक्तींच्या पुतळ्यांवर रोषणाई झाली. तेव्हा म. ए. समितीचे शुभम शेळके यांनी छत्रपती शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीवर रोषणाई नसल्याकडे लक्ष वेधले आणि त्यानंतर तेथेही रोषणाई झाली.
गेल्या चार-पाच दिवसांपासून बेळगाव शहर जणू नववधूप्रमाणे नटले होते. ऐतिहासिक काँग्रेस विहिरीनजीकचा आताचा वीरसौध म्हणून ओळखला जाणारा परिसर हे ऐतिहासिक स्मारक आहे. या ठिकाणीच शंभर वर्षांपूर्वी अधिवेशन झाले होते. काँग्रेस पक्षाने वीरसौधचासुद्धा या निमित्ताने कायापालट केला. या ठिकाणी महात्मा गांधीजींचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला. स्मारकाच्या आत असणाऱ्या सर्व छायाचित्रांचे डिजिटलायझेशन करण्यात आले. त्यामुळे ही छायाचित्रे चिरंतन राहणार आहेत. बेळगावला येणाऱ्या पर्यटकांनी किंवा बाहेरील नागरिकांनी आवर्जून पाहावे असे आता वीरसौध स्मारक झाले आहे.
बेळगाव भेट औत्सुक्याची
या अधिवेशनाच्या निमित्ताने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी व संसदेत प्रथमच पाऊल टाकणाऱ्या खासदार प्रियांका गांधी यांची बेळगाव भेट ही अनेकांसाठी औत्सुक्याची होती. काँग्रेस विहिरीपासून सर्वत्र पक्षाच्या महनीय नेत्यांबरोबरच त्या काळी अधिवेशनासाठी धडपडलेल्या आणि आलेल्या निमंत्रितांची छायाचित्रे तिरंग्याच्या रंगांमध्ये लावलेली पाहायला मिळत होती. सीपीएड मैदानावर भव्य शामियाना उभारण्यात आला होता.
सुवर्णसौध परिसरामध्ये महात्मा गांधींचा पुतळा उभारण्यात आला होता. त्याचे अनावरण दि. 27 रोजी होणार होते. यादिवशी महनीय व्यक्ती, माध्यम प्रतिनिधी यांच्यासह कार्यकर्त्यांच्या भोजनाची सोय केली जाणार होती. त्यामुळे दि. 26 रोजी दुपारपासूनच महिलावर्ग कामाला लागला होता. 26 रोजी सकाळी वीरसौध येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण, गंगाधरराव देशपांडे स्मारक अनावरण, वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन, काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची सभा असे भरगच्च कार्यक्रम झाले.
उत्साहावर दु:खाचे सावट
सर्वांनाच उत्सुकता होती ती 27 तारखेला होणाऱ्या सार्वजनिक सभेची. या सभेमध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी कोणते मुद्दे मांडतील? याच्या चर्चाही रंगल्या होत्या. अधिवेशनाची तयारी, मिळणारा प्रतिसाद आणि भरगच्च कार्यक्रमांना लाभलेली उपस्थिती पाहून पक्षनेत्यांबरोबर कार्यकर्त्यांचा उत्साहही दुणावला होता. परंतु, दुर्दैवाने या उत्साहावर दु:खाचे सावट पसरले. माजी पंतप्रधान, अर्थतज्ञ व सभ्य अशी ज्यांची प्रतिमा होती, त्या डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले आणि काँग्रेस पक्षाने आपले सर्व कार्यक्रम त्वरित रद्द केले.
अधिवेशनाचा कार्यक्रम परत घेता येईल. परंतु, पक्षाने आपल्या नेत्याला म्हणजेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाची नोंद घेत त्यांना आदरांजली म्हणून कार्यक्रम रद्द केले. हे अपेक्षित असले तरी सत्वर निर्णय घेणे सोपे नव्हते. या अधिवेशनाच्या निमित्ताने बेळगावकरांनी आपल्या शहरावर चढलेला नवा साज अनुभवला. पक्ष म्हटले की विरोध, टीका अपरिहार्य आहे.
माणुसकी नेहमीच सरस
आज अनेकांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाण्याचे दु:ख व्यक्त केले. परंतु, काँग्रेस पक्षाने केलेली तयारी वाया गेली, याबद्दलही खेद व्यक्त केला. कारण शेवटी पक्ष, संघटना, मतमतांतरे यापेक्षाही माणुसकी नेहमीच सरस ठरत आली आहे. त्यामुळे बेळगावकरांनी व्यक्त केलेला खेद निश्चितच त्यांच्यातील माणुसकीचे दर्शन घडवतो.
अधिवेशनाच्या व्यासपीठावर श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या वृत्तानंतर प्रत्येकाच्याच मनात अधिवेशनाच्या पूर्ततेबद्दल प्रश्न उपस्थित झाले. रात्री 10.30 वाजता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व कार्यक्रम रद्द झाल्याची घोषणा केली. ज्या सीपीएड मैदानावर पक्षाने ‘गांधी भारत’ हा कार्यक्रम आयोजित केला होता, त्याच व्यासपीठावर पक्षातर्फे डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.









