गणेशोत्सव – ईद-ए मिलाद शांततेत साजरा करण्याचे पोलिसांचे बैठकीत आवाहन
खानापूर : गणेशोत्सव आणि ईद-ए मिलादच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासंदर्भात शुक्रवारी सकाळी येथील ता. पं. सभागृहात शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रकाश गायकवाड होते. यावेळी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी विरनगौडर एगनगौडर, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष कुरबेट, हेस्कॉमचे अभियंत्या लक्ष्मी रंगनाथ यासह विविध शासकीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. प्रथम उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. गणेशोत्सव आणि ईद-ए मिलाद दोन्ही सण तालुक्यात शांततेत पार पाडण्यात यावेत, तसेच शांतता सलोखा राखण्यात यावा, आणि गणेशोत्सवसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात याव्यात, परवानग्या सुरळीत मिळण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
गणेशोत्सव काळात कार्यकर्त्यांनी सयंम आणि शिस्त पाळून गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, तसेच विसर्जनावेळी मंडळांनी आपापल्या जबाबदारीने विसर्जन शांततेत पार पाडावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांनी केले. या संपूर्ण गणेशोत्सव काळात शहरात व तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष पंडित ओगले, रवि काटगी, भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, प्रकाश देशपांडे, बसीर राऊत यासह अनेकांनी विचार मांडले. यावेळी प्रकाश चव्हाण, महादेव कोळी, नगरसेवक विनायक कलाल, अप्पय्या कोडोळी, रफिक वारीमणी यासह तालुक्यातील तसेच शहरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









