सुरक्षा दलांकडून मोहीम सुरूच : 3 दहशतवाद्यांना अटक
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे नियंत्रण रेषेनजीक भारतीय सैन्य आणि पोलिसांच्या संयुक्त मोहिमेत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले गेले आहे. कुपवाडा जिल्ह्यातील डोबनार मचल भागातील नियंत्रण रेषेनजीक झालेल्या कारवाईत हे दहशतवादी मारले गेले आहेत. तर शोधमोहीम अद्याप सुरू असून मृत दहशतवाद्यांची ओळख पटू शकलेली नाही.
तत्पूर्वी बांदीपोरा पोलिसांनी 13 राष्ट्रीय रायफल्स आणि 45 बीएम सीआरपीएफसोबतच्या एका संयुक्त माहिमेत बहाराबाद हाजिन भागातून लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याला ताब्यात घेतले. या दहशतवाद्याकडून दोन चिनी हँडग्रेनेड हस्तगत झाले आहेत. त्याच्या विरोधात शस्त्रास्त्र कायदा तसेच युएपीए अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याचबरोबर बारामुल्ला पोलिसांनी 3 दहशतवाद्यांना अटक केली आहे. मोहम्मद अशरफ मीर, मोहम्मद यासीन भट आणि वासिद अशरफ सोफी अशी या दहशतवाद्यांची नावे आहेत.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या नव्या कार्यपद्धतीबद्दल सुरक्षा दलांनी जनतेला सावध केले आहे. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी सध्या मोबाइलकरता एक नवी पद्धत अवलंबित आहेत. अनोळखी व्यक्तीच्या मोबाइलमधील हॉटस्पॉट सुविधेचा वापर दहशतवादी करत आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या रडारपासून वाचण्यासाठी दहशतवादी हा मार्ग अनुसरत आहेत. सिमकार्डचा गैरवापर किंवा एखाद्या दहशतवाद्याला हॉटस्पॉटद्वारे कनेक्टिव्हिटी दिल्यास संबंधित कार्डधारकाला कारवाईला सामोरे जावे लागले असा सतर्कतेचा इशारा पोलिसांनी दिला आहे.









