वृत्तसंस्था/ शिलाँग
पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट स्वत:चा दोन आमदारांसोबत मेघालयातील सत्तारुढ नॅशनल पीपल्स पार्टीमध्ये विलीन झाला आहे. याचबरोबर 60 सदस्यीय राज्य विधानसभेत सत्तारुढ पक्षाच्या आमदारांची संख्या वाढून 28 झाली आहे. शिलाँगमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांचा विलय झाला आहे.
पीडीएफ अध्यक्ष गाविन मिलिएम आणि कार्यकारी अध्यक्ष बांतेइदोर लिंगडोह यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व पदाधिकारी सत्तारूढ एनपीपीत सामील झाले. मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्याकडून आसामसोबतचा सीमावाद सोडविण्याचे आणि खासी भाषेला आठव्या अनुसूचीत स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वसन मिळाल्यानंतर पीडीएफने एनपीपीत विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचे लिंगडोह यांनी सांगितले आहे.
कृषी धोरणाची निर्मिती, रोजगार निर्मिती धोरणाची अंमलबजावणी, पारदर्शक आणि प्रभावी भरती धोरण, मेघालय लघूखनिज सवलत नियम 2016 ची समीक्षा, 2028 पर्यंत विजेच्या पुरवठ्यात सुधारणा आणि हवाईसंपर्क वाढविण्याचे आश्वासन मिळाल्याचे लिंगडोह यांनी म्हटले आहे.
पीडीएफ विलीन झाल्याने एनपीपी मजबूत होणार आहे. या सर्व नेते अन् कार्यकर्त्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. विलीनीकरण दस्तऐवजात नमूद मुद्द्यांवर मिळून काम करणार असल्याचे आश्वासन कोनराड संगमा यांनी पीडीएफ कार्यकर्ते तसेच नेत्यांना दिले आहे.
पीडीएफ विलीन झाल्यावर एनपीपीमध्ये सर्व स्तरांवर पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सोहरा अन् मावकिनरू या दोन्ही मतदारसंघांच्या ब्लॉक समित्यांची त्वरित पुनर्रचरा करु अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.









