वृत्तसंस्था/ दुबई
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) भारताचा टी-20 मधील आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज अर्शदीप सिंगविऊद्ध 21 सप्टेंबर रोजी दुबई येथे झालेल्या आशिया कपमधील भारत व पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान ‘अश्लील हावभाव’ केल्याची तक्रार दाखल केली आहे, असे समा टीव्ही सूत्रांनी सांगितले आहे.
रविवारी झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्यापूर्वी सुपर फोर सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहा गड्यांनी विजय मिळवल्यानंतर अर्शदीपविऊद्ध त्याच्या वर्तनाबद्दल आयसीसीने कारवाई करावी अशी मागणी पीसीबीने केली. सदर डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने प्रेक्षकांकडे पाहून अनैतिक हावभाव करून आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले असल्याचा आरोप पाकिस्तानच्या तक्रारीत करण्यात आला आहे.
पीसीबीने एका निवेदनात असे म्हटले आहे की, अर्शदीपच्या कृतीमुळे क्रिकेटची बदनामी झाली आहे. समा टीव्हीनुसार, पाकिस्तान बोर्डाने आयसीसीला आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर शिस्तभंगाच्या प्रक्रियेनुसार कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. अर्शदीपविऊद्ध तक्रार दाखल करण्यापूर्वी पीसीबीने भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविऊद्ध आयसीसीकडे दोन तक्रारी दाखल केल्या होत्या. 14 सप्टेंबर रोजी झालेल्या गट स्तरावरील सामन्यानंतर पहलगाम घटनेबाबत सूर्यकुमारने केलेल्या टिप्पणीविऊद्ध पीसीबीने तक्रार केली होती.
पहलगामसंबंधी टिप्पणीवरून आयसीसीने सूर्यकुमारला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. भारतीय कर्णधाराने दोषी नसल्याचे स्पष्टीकरण दिलेले असले, तरी आयसीसी सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी ते फेटाळले. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजाप्रमाणे सूर्यकुमारलाही त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफला दंड ठोठावला आहे, तर सलामीवीर फलंदाज साहिबजादा फरहानला सुपर फोर सामन्यादरम्यान आनंद साजरा करताना केलेल्या वादग्रस्त हावभावांबद्दल इशारा देऊन सोडण्यात आले आहे.









