वृत्तसंस्था/ दुबई
भारताविरुद्धच्या सामन्यानंतर हस्तांदोलन टाळल्याने निर्माण झालेल्या वादाचे खापर सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्यावर फोडून आणि त्यांना जबाबदार धरून पीसीबीने माघार घेण्याची धमकी दिली होती. तरीही आयसीसीने चालू आशिया चषक स्पर्धेच्या अधिकाऱ्यांच्या मंडळातून झिम्बाब्वेच्या सदर व्यक्तीला काढून टाकण्याची पाकिस्तानची मागणी फेटाळली.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती की, रविवारी झालेल्या आशिया चषक सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी पायक्रॉफ्ट यांनी त्यांचे कर्णधार सलमान अली आगा यांना भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्याशी हस्तांदोलन न करण्यास सांगितले होते. ‘सोमवारी रात्री उशिरा आयसीसीने पीसीबीला उत्तर पाठवले आहे की, पायक्रॉफ्ट यांना काढून टाकले जाणार नाही आणि त्यांची विनंती फेटाळण्यात आली आहे’, असे आयसीसीच्या सूत्रांनी सांगितले. झिम्बाब्वेचे सदर 69 वर्षीय माजी खेळाडू बुधवारी संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध होणाऱ्या पाकिस्तानच्या शेवटच्या गटस्तरीय सामन्यात काम पाहणार आहेत.
पाकिस्तान संघाचे व्यवस्थापक नावेद चिमा यांनीही आशियाई क्रिकेट मंडळाकडे तक्रार दाखल केली होती की, पायक्रॉफ्ट यांच्या आग्रहामुळे रविवारी दोन्ही कर्णधारांनी नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन संघाच्या याद्या एकमेकांना दिल्या नाहीत. भारताने सात गडी राखून जिंकलेल्या सामन्यानंतर सूर्यकुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सन्मानार्थ प्रतिस्पर्ध्यांशी हस्तांदोलन केले नव्हते. पायक्रॉफ्ट हे ‘आयसीसी एलिट पॅनल’मधील सर्वांत वरिष्ठ सामनाधिकाऱ्यांपैकी एक असून त्यांनी पुरुष व महिला क्रिकेटमधील तिन्ही स्वरुपांचा विचार करता 695 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जबाबदारी हाताळलेली आहे.
पीसीबीचे क्रिकेट ऑपरेशन्स संचालक उस्मान वाल्हा यांनी त्यांच्याच कर्णधाराला स्पर्धेदरम्यान पाळल्या जाणाऱ्या नियमांची माहिती न दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचे विश्वसनीयरीत्या कळते. मिळालेल्या माहितीनुसार, आशियाई क्रिकेट मंडळाचे (एसीसी) विद्यमान अध्यक्ष आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांनी सोमवारी पाकिस्तान संघ आणि त्यांच्या कर्णधाराला लाजिरवाण्या परिस्थितीला तोंड द्यावे लागल्याबद्दल वाल्हा यांची हकालपट्टी करण्याचे आदेश दिले.









