वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्टार फलंदाज बाबर आझम आणि यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान यांना श्रेणी-अ मधून श्रेणी-ब मध्ये हलवले आहे. बोर्डाने नवीन मध्यवर्ती करारासाठी 30 खेळाडूंची यादी जाहीर केली. यामध्ये खेळाडूंची संख्या 27 वरून 30 करण्यात आली आहे. खराब कामगिरीमुळे आशिया चषकाबाहेर बसावे लागलेल्या या दोघांना पीसीबीने आता केंद्रीय करार यादीतून डिमोशन केल्याने त्यांच्या भविष्याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यंदाच्या हंगामात श्रेणी-अ चा समावेश करण्यात आलेला नाही. गतवर्षी, बाबर आणि रिझवान हे एकमेव खेळाडू होते ज्यांना श्रेणी अ मध्ये स्थान देण्यात आले होते. या हंगामात पीसीबीने श्रेणी अ रद्द केली आहे. मागील काही काळापासून हे दोन दिग्गज खेळाडू खराब फॉर्मशी झगडत आहेत. याचा फटका त्यांना बसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, हा करार 1 जुलै 2025 ते 30 जून 2026 पर्यंत असेल.
नव्या खेळाडूंना संधी आणि बढती
12 तरुण खेळाडूंना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे पहिल्यांदाच केंद्रीय करार देण्यात आला. यामध्ये अहमद दानियल, फहीम अशरफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद अब्बास, मोहम्मद हरिस, मोहम्मद नवाज, साहिबजादा फरहान, सलमान मिर्झा आणि सुफियान मोकीम यांचा समावेश आहे. दरम्यान, गतवर्षी शानदार कामगिरी करणाऱ्या अबरार अहमद, हॅरिस रौफ, सॅम आयुब, सलमान अली आगा आणि शादाब खान यांना क श्रेणीतून ब श्रेणीत बढती देण्यात आली आहे.
दरम्यान, आशिया कपसाठी बाबर आणि रिझवान संघात नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) रविवारी आशिया कप आणि त्यापूर्वी होणाऱ्या यूएई तिरंगी मालिकेसाठी 17 सदस्यीय टी-20 संघाची घोषणा केली. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. संघाचे नेतृत्व अष्टपैलू सलमान आगा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. आशिया कप 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये खेळला जाईल. त्याच वेळी, त्यापूर्वी होणाऱ्या तिरंगी मालिकेत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि यूएई सहभागी होतील.









