वृत्तसंस्था/ लाहोर
पाकचे माजी क्रिकेटपटू पीसीबीचे राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष इंझमाम उल हक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय संघातील अनेक खेळाडूंचे व्यवस्थापन एक कंपनी करीत असून खेळाडूंच्या हितबाधासंदर्भात इंझमाम यांचा काय संबंध आहे, याची पीसीबीने चौकशी करण्याचे ठरविले असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
याझू इंटरनॅशनल या कंपनीमध्ये इंझमाम यांची कोणती भूमिका आहे, याचा तपास करण्यासाठी पीसीबीने पाच सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. या कंपनीचे एजंट बाबर आझम, शाहीन शहा आफ्रिदी, यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान यांच्यासह इंझमाम यांचेही व्यवस्थापन करीत आहे. या परिणाम म्हणून विश्वचषक स्पर्धा सुरू असतानाच इंझमाम यांना राजीनामा देणे भाग पडले आहे. एजंट व पार्टनर ताल्हा रेहमानी यांच्याशी असलेल्या संबंधांचा निवड समिती अध्यक्ष म्हणून निर्णयप्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही किंवा कोणतीही तडजोड केलेली नसल्याचे इंझमाम यांनी स्पष्ट केले आहे.









