वृत्तसंस्था/लाहोर
नुकत्याच झालेल्या 2025 च्या आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतून पाक क्रिकेट मंडळाला (पीसीबी) सुमारे 1 कोटी अमेरिकन डॉलर्सची कमाई झाल्याचे सांगण्यात आले. या स्पर्धेत रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेसाठी लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथील स्टेडियम्सचा दर्जा सुधारण्यासाठी पीसीबीने खूपच खर्च केल्याचे पीसीबीचे प्रवक्ते अमिर मीर आणि जावेद मुर्तझा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. मात्र या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खर्चाची जबाबदारी आयसीसीने उचलल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान सामन्यांच्या तिकीट विक्रीतून पीसीबीला आयसीसीकडून सुमारे 3 अब्ज रुपये मिळतील, अशी अपेक्षा आहे. 2023-24 च्या वर्षामध्ये पीसीबीची कमाई एकूण 10 अब्ज डॉलर्स एवढी झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कमाई 40 टक्क्यांने वाढली आहे. पीसीबीला या स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी मिळाल्याने त्यांनी जगातील तीन श्रीमंत क्रिकेट मंडळांचे आभार मानले. मात्र पीसीबीला या कमाईतून सुमारे 4 कोटी रुपये कर म्हणून द्यावा लागत असल्याचेही मुर्तझा यांनी सांगितले.









