वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील शनिवारी येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात प्रभसिमरन सिंगचे शानदार शतक तसेच हरप्रित ब्रारच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पंजाब किंग्जने यजमान दिल्ली कॅपिटल्सला 31 धावांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 20 षटकात 7 बाद 167 धावा जमवल्या. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 बाद 136 धावापर्यंत मजल मारली.

दिल्ली संघाच्या डावात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने एकाकी लढत देत 27 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह 54 धावा जमवताना सॉल्टसमवेत पहिल्या गड्यासाठी 38 चेंडूत 69 धावांची भागीदारी केली. सॉल्टने 17 चेंडूत 3 चौकारासह 21 धावा जमवल्या. पंजाबच्या हरप्रित ब्रारने सॉल्टचा त्रिफळा उडविल्यानंतर राहुल चहरने मिचेल मार्शला 3 धावावर पायचित केले. हरप्रित ब्रारने आपल्या एकाच षटकातील पहिल्या चेंडूवर रॉसोला तर शेवटच्या चेंडूवर वॉर्नरला पायचित केले. पॉवर प्ले दरम्यान दिल्लीने 6 षटकात 65 धावा जमवल्या होत्या. दिल्लीचा निम्मा संघ 86 धावात तंबूत परतला होता. त्यानंतर त्यांना डाव सावरता आला नाही. अमन खानने 18 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 16 तर दुबेने 20 चेंडूत 2 चौकारांसह 16, कुलदीप यादवने नाबाद 10 तर मुकेशकुमारने नाबाद 6 धावा केल्या. दिल्लीला अवांतराच्या रुपात 4 धावा मिळाल्या. त्यांच्या डावात 2 षटकार आणि 17 चौकार नोंदवले गेले. पंजाबतर्फे ब्रारने 30 धावात 4 तर इलिस आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात पंजाब किंग्जने 12 सामन्यातून 12 गुणासह सहावे स्थान मिळवले असून दिल्ली कॅपिटल्स 8 गुणासह शेवटच्या स्थानावर आहे.
तत्पुर्वी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. दिल्लीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर पंजाब किंग्जचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. मात्र, सलामीचा प्रभसिमरन सिंग हा अपवाद म्हणावा लागेल. आयपीएल स्पर्धेतील प्रभसिमरन सिंगने आपले पहिले शतक झळकविले. त्याने 65 चेंडूत 6 षटकार आणि 10 चौकारासह 103 धावा झळकवल्या. सॅम करनने 24 चेंडूत 1 चौकारासह 20 तर सिकंदर रझाने 7 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 11 धावा जमवल्या. पंजाब किंग्जच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पंजाबने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 46 धावा जमवताना 3 फलंदाज गमवले. पंजाबचे अर्धशतक 41 चेंडूत नोंदवले गेले. प्रभसिमरन सिंगने आपले अर्धशतक 42 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने झळकविताना चौथ्या गड्यासाठी सॅम करनसमवेत अर्धशतकी भागीदारी 41 चेंडूत केली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी नोंदवल्याने पंजाब संघाला 167 धावापर्यंत मजल मारता आली. पंजाबचे शतक 79 चेंडूत तर दीडशतक 106 चेंडूत फलकावर लागले. पंजाबच्या डावात 8 षटकार आणि 13 चौकार नोंदवले गेले. पंजाबला 13 अवांतर धावा मिळाल्या. त्यामध्ये 11 वाईड आणि 2 लेगबाईजचा समावेश आहे. दिल्लीतर्फे इशांत शर्माने 27 धावात 2 तर अक्षर पटेल, प्रवीण दुबे, कुलदीप यादव आणि मुकेशकुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 2023 च्या आयपीएल हंगामात शतक नोंदवणारा प्रभसिमरन सिंग हा पाचवा फलंदाज आहे. तत्पुर्वी हॅरी ब्रुक, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव आणि वेंकटेश अय्यर यांनी शतके झळकविली आहेत.
संक्षिप्त धावफलक : पंजाब किंग्ज 20 षटकात 7 बाद 167 (प्रभसिमरन सिंग 65 चेंडूत 103, सॅम करन 24 चेंडूत 20, सिकंदर रझा 7 चेंडूत नाबाद 11, धवन 7, लिव्हिंगस्टोन 4, जितेश शर्मा 5, शाहरुख खान 2, अवांतर 13, इशांत शर्मा 2-27, अक्षर पटेल 1-27, प्रवीण दुबे 1-19, कुलदीप यादव 1-32, मुकेशकुमार 1-3).
दिल्ली कॅपिटल्स 20 षटकात 8 बाद 136 (डेव्हिड वॉर्नर 27 चेंडूत 54, सॉल्ट 17 चेंडूत 21, मिचेल मार्श 3, रोसो 5, अक्षर पटेल 1, मनीष पांडे 0, अमन खान 18 चेंडूत 16, प्रवीण दुबे 20 चेंडूत 16, कुलदीप यादव 17 चेंडूत नाबाद 10, मुकेशकुमार नाबाद 6, अवांतर 4, हरप्रित ब्रार 4-30, राहुल चहर 2-16, नॅथन इलिस 2-26).









