सेबीची मान्यता : समभाग जवळपास 6 टक्क्यांनी तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
वन 97 कम्युनिकेशन्स लिमिटेडची उपकंपनी असलेली पेटीएम मनी लिमिटेड आता रिसर्च अॅनालिस्ट बनली आहे. शेअर बाजाराला दिलेल्या एका माहितीत कंपनीने म्हटले आहे की, पेटीएम मनीला मंगळवारी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून रिसर्च अॅनालिस्ट म्हणून नोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. रिसर्च अॅनालिस्टच्या मदतीने, पेटीएम मनी आता देशभरातील वापरकर्त्यांना गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन सेवा प्रदान करण्यास सक्षम राहणार आहे. दरम्यान सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर पेटीएमचे समभाग हे 6 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले.
पेटीएम मनी अॅपमध्ये लवकरच अन्य सेवा
एक्सचेंज फाइलिंगनुसार, या सेवा लवकरच पेटीएम मनी अॅपमध्ये संशोधन आणि सल्लागार ऑफरिंगच्या स्वरूपात एकत्रित केल्या जाणार आहेत. ज्यामुळे गुंतवणूकदारांना चांगले आर्थिक निर्णय घेण्यास मदत होईल. ‘या नोंदणीसह, पेटीएम मनी लिमिटेड आता सेबीच्या नियमांनुसार गुंतवणूक अंतर्दृष्टी, संशोधन अहवाल आणि डेटा-आधारित विश्लेषणासह संशोधन सेवा प्रदान करण्यास सक्षम राहणार आहे.’
वन 97 कम्युनिकेशन्सने काय म्हटले
सेबीची मान्यता पेटीएम मनीच्या ध्येयाशी सुसंगत आहे. कंपनीच्या मते, सेबीची मान्यता भारतातील वापरकर्त्यांसाठी गुंतवणूक सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्याच्या त्यांच्या ध्येयाशी सुसंगत आहे. ‘हे महत्त्वपूर्ण यश पेटीएम मनीच्या गुंतवणूक परिसंस्थेत सेवांचा विस्तार करणे, वापरकर्ता अनुभव सुधारणे आणि किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांना तज्ञ-समर्थित अंतर्दृष्टी प्रदान करण्याच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे,’ असे फाइलिंगमध्ये म्हटले आहे.









