एनएचएआयकडून 39 बँकांची नवी यादी सादर : पेटीएम पेमेंटचे नाव वगळले
नवी दिल्ली :
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात (एनएचएआय) ने फास्टॅग जारी करणाऱ्या बँकांची सुधारित यादी सादर केली आहे. आता या यादीत 39 बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांचा (एनबीएफसी) समावेश करण्यात आला आहे. एनएचएआयने फेब्रुवारीमध्ये 32 बँकांची यादी जाहीर केली होती.
पेटीएम पेमेंट्स बँकेचे नाव सुधारित यादीत समाविष्ट नाही. कारण भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने पेटीएम पेमेंट बँकेला नियामक नियमांचे पालन न केल्यामुळे आणि इतर अनेक अनियमिततेमुळे 15 मार्च नंतर सर्व बँकिंग व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
15 मार्चपर्यंत वापरता येणार
अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे पेटीएमचा फास्टॅग असेल तर तुम्ही 15 मार्चपर्यंत त्याचा वापर करू शकाल. परंतु या दिवसानंतर, शिल्लक संपल्यास, तुम्हाला नवीन फास्टॅग घ्यावा लागेल. कारण, या दिवसानंतर तुम्ही ते टॉप-अप करू शकणार नाही. नियमांनुसार फास्टॅगद्वारे पेमेंट न केल्यास दुप्पट टोल भरावा लागतो.
31 जानेवारी रोजी, आरबीआयने आदेशात पीपीबीएलला 29 फेब्रुवारीपर्यंत सर्व बँकिंग सेवा बंद करण्याचे आदेश दिले होते, ज्यामध्ये नंतर 15 मार्चपर्यंत सुधारणा करण्यात आली.
पेटीएम क्यूआर, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन 15 मार्चनंतरही कार्यरत
पेटीएम क्यूआर, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन 15 मार्चनंतरही सर्व व्यापारी भागीदारांसाठी काम करत राहतील.









