मुंबई:
खाद्यपदार्थ आणि किराणा मालाची ऑर्डर मोफत पोचवणाऱ्या स्विगी कंपनीने आता यापुढे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आगामी काळात प्रत्येक ऑर्डर मागे ग्राहकाकडून 2 रुपये प्लॅटफॉर्म शुल्काच्या माध्यमातून घेण्याचे निश्चित केले आहे. सध्याला प्लॅटफॉर्म शुल्क कंपनी बेंगळूर, हैदराबाद या शहरांमध्ये लागू करते आहे. आगामी काळामध्ये इतर शहरांमध्येसुद्धा हे शुल्क ग्राहकांवर लादले जाणार आहे. आत्तापर्यंत कंपनी आपल्या स्विगी वन ग्राहकांकडून हे शुल्क घेत नव्हती पण यापुढे हे शुल्क त्यांच्याकडूनही वसूल केले जाणार आहे, असे समजते. सध्याला खाद्य पदार्थांची ऑर्डर ही जेमतेम असतानाच असा निर्णय घेतला असल्याने याबाबत चर्चा होत आहे. खाद्य वितरण व्यवसायाने अपेक्षित विकास साध्य न केल्यानेच कंपनीने शुल्काचा मार्ग अवलंबल्याचे बोलले जाते.
एका माहितीनुसार स्विगीच्या माध्यमातून एकाच दिवसात जवळपास 16 लाख ऑर्डर ग्राहकांकडून नोंदवली जातात. अशा पद्धतीने प्रति ऑर्डरवर 2 रुपये आकारल्यानंतर कंपनीला सरासरी 32 लाख रुपये रोजचे प्राप्त होऊ शकतात.









