अतिथी शिक्षक संघटनेचे सुवर्णसौधसमोर आंदोलन
बेळगाव : राज्यात 45 हून अधिक प्राथमिक व माध्यमिक सरकारी शाळांमध्ये अतिथी शिक्षक कार्यरत आहेत. परंतु, या अतिथी शिक्षकांना केवळ नऊ-दहा महिन्यांसाठी तुटपुंज्या वेतनावर काम करावे लागत आहे. तसेच त्यांना इतर कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्याने अतिथी शिक्षकांचे हाल होत आहेत. यासाठी सेवेमध्ये कायम करावे, उन्हाळी सुटीसह बारा महिन्यांचे वेतन द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी कर्नाटक राज्य प्राथमिक व माध्यमिक अतिथी शिक्षक असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी सुवर्ण विधानसौध परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले.
अतिथी शिक्षकांना अवघ्या दहा हजार व साडेदहा हजार पगारावर काम करावे लागत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेदेखील कठीण झाले आहे. वेतनात वाढ व्हावी, यासाठी अनेकवेळा जिल्हाभर आंदोलने करण्यात आली. परंतु, अद्याप या मागणीला यश आलेले नाही. तुटपुंजे वेतन असतानाही केवळ नऊ ते दहा महिने काम मिळत आहे. उरलेल्या वेळी इतर नोकरीवर अवलंबून रहावे लागत असल्याने शालेय शिक्षण विभागाने या सर्व अतिथी शिक्षकांना कायम करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात आली.
दरवर्षी गुणवत्तेनुसार अतिथी शिक्षकांची नेमणूक केली जात असल्याने जुन्या अतिथी शिक्षकांना इतर ठिकाणी नोकरी करावी लागते. त्यामुळे गुणवत्तेची अट बाजूला करावी, दरवर्षी पाच टक्के ग्रॅच्युईटी द्यावी, दिल्ली, हरियाणा, पंजाब व उत्तर प्रदेशच्या धर्तीवर अतिथी शिक्षकांना सेवा द्याव्यात. ज्या शाळांमध्ये सेवा देण्यात आली तेथील सेवा प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी राज्यातील अतिथी शिक्षकांकडून करण्यात आली. या आंदोलनाला बेळगावसह उत्तर कर्नाटकातील शेकडो अतिथी शिक्षक उपस्थित होते.









