रायबाग सरकारी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
बेळगाव : रायबाग सरकारी रुग्णालयामध्ये सेवा बजाविणाऱ्या कंत्राटी डी ग्रुप कर्मचाऱ्यांना वर्षभरापासून वेतन देण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. थकलेले वेतन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली. रायबाग सरकारी तालुका रुग्णालयामध्ये कंत्राटी तत्त्वावर डी ग्रुप कर्मचारी म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत. प्रत्येक महिन्याला वेतन देण्यात येत होते. मात्र गेल्या वर्षभरापासून वेतन देण्यात आलेले नाही. वेतन वेळेत देण्यात यावे, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून या वेतनावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. वेतन मिळाले नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. याची दखल घेऊन त्वरित वेतन द्यावे, अशी मागणी करण्यात आली. कामगार हितरक्षण सेवा संघ, रायबाग यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक कर्मचारी उपस्थित होते.









