अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
भाडोत्री घरांमध्ये अंगणवाडी भरविणाऱ्या अंगणवाड्यांचे गेल्या 20 महिन्यांपासून भाडे देण्यात आले नसल्याने मालकांकडून अंगणवाडी खाली करण्याची मागणी केली जात आहे. अधिकाऱ्यांना कळवूनही प्रतिसाद देण्यात येत नसल्याने अंगणवाडी चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांनी तत्काळ याकडे लक्ष घालून समस्या निकालात काढावी, अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य अंगणवाडी नोकर संघ बेळगाव जिल्हा विभागातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
आयसीडीएस योजनेंतर्गत जवळपास 40 वर्षांपासून मानधनावर अंगणवाडी कार्यकर्त्या काम करत आहेत. गर्भवती महिलांची देखभाल करणे, तीन ते सहा वर्षाखालील मुलांना पूर्वप्राथमिक शिक्षण देणे, पौष्टिक आहार देणे याबरोबरच सरकारच्या विविध योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे, विविध सर्व्हे करणे, अशी कामे अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करवून घेतली जात आहेत.
मुलांना शिकविण्यासाठी, पौष्टिक आहार वितरण करण्यासाठी योग्य इमारती नसल्याकारणाने मंदिर, भाडोत्री घरांमध्ये अंगणवाडी भरविल्या जात आहेत. अंगणवाडी इमारतींसाठी अधिकाऱ्यांकडे अनेकवेळा मागणी केली. भाडोत्री घरांमध्ये अंगणवाडी भरविण्यात येत आहेत. मात्र खात्याकडून अंगणवाडी केंद्रांचे भाडे थकविण्यात आल्याने मालकांकडून अंगणवाडी खाली करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत अधिकाऱ्यांना कळवूनही दुर्लक्ष केले जात असल्याने अंगणवाडी चालविणे कठीण झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित अधिकाऱ्यांना समस्या निवारण करण्याची सूचना करावी, अशा मागणीचे निवेदन अंगणवाडी नोकर संघातर्फे दिले आहे. यावेळी अध्यक्ष दोडव्वा पुजारी, गोदावरी राजापुरे, चन्नम्मा गडकरी उपस्थित होते.









