शेतकऱ्यांची साखर उपायुक्तांकडे मागणी
बेळगाव : गळीत हंगाम संपून दोन महिने उलटले आहेत. मात्र अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले अजूनही दिली नाहीत. ऊस घेऊन गेल्यानंतर 15 दिवसांमध्ये बिल देणे बंधनकारक आहे. असे असताना अजूनही बिले देण्यात आली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी गणेशपूर येथील निलजलिंगप्पा साखर संस्थेला घेराव घालून बिले देण्याची मागणी केली आहे. यावर्षीची बिले काही साखर कारखान्यांनी दिली नाहीत तर मागील वर्षांची बिले अजूनही देण्यात आली नाहीत. रामदुर्ग तालुक्यातील शिवसागर, शिरगुप्पी शुगर्स आणि मलप्रभा साखर कारखान्याने शेतकऱ्यांची बिले देणे बाकी आहे. जिल्ह्यातील 630 शेतकऱ्यांचे 7 कोटी 80 लाख रुपये रक्कम देणे बाकी आहे. याबाबत अनेकवेळा जिल्हाधिकारी तसेच साखर आयुक्तांकडेही तक्रार देण्यात आली आहे. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शुक्रवारी निलजलिंगप्पा साखर संस्थेला घेराव घालून ही मागणी केली. सध्या खरीप हंगामाची पेरणी सुरू असून शेतकऱ्यांना आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. खरीप पेरणीसाठी बी-बियाणे, खते घेणे अवघड झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत आहे. बिले कारखान्याकडे अडकली असताना शेतकऱ्याला दुसरीकडून कर्ज घ्यावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप होत आहे. तातडीने संबंधित साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची बिले देण्याची सूचना करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी बिले देताना ती नियमानुसार दिली नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी एफआरपीपेक्षाही कमी दर असल्याची तक्रार करत आहेत. तेंव्हा संबंधित साखर कारखान्यांना सरकारने जाहीर केलेला दर द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, प्रकाश नाईक, रावसाहेब घाळीमठ, मधुमती घाळीमठ, संजू घाळीमठ, अर्चना घाळीमठ, भाऊसाहेब लठे, सागर अक्कीवाट, नागेंद्र कुंभार, बाळासाहेब हावळे, सविता हावळे, धोंडीराम जगदाळे व शेतकरी उपस्थित होते.









