विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व्हेअरांकडून जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन
बेळगाव : 2022-23 मधील रब्बी हंगामातील पिकांचा सर्व्हे केलेल्या सर्व्हेअरना वर्ष उलटले तरी मानधन दिलेले नाही. त्यामुळे सर्व्हेअर आर्थिक संकटात सापडले आहेत. सदर मानधन त्वरित देण्यात यावे, या मागणीसह इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सर्व्हेअरकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पीक सर्व्हे करण्याची निरंतर प्रक्रिया आहे. 2018-19 पासून या सर्व्हे कामामध्ये आपण कार्यरत आहोत. 2022-23 मध्ये रब्बी हंगामातील सर्व्हे करण्यात आला आहे. मात्र, सर्व्हेअरना मानधन दिलेले नाही. याबाबत कृषी अधिकारी, तालुका अधिकारी, साहाय्यक कृषी अधिकाऱ्यांना कळविले आहे. मात्र, याची दखल घेण्यात आली नाही. यासाठी त्वरित मानधन जमा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सेवेत कायम करण्याची मागणी
सेवेमध्ये कायम करण्यात यावे, शेतवडीत सर्व्हेसाठी गेले असताना दुर्घटना घडल्यास मृत पावलेल्या सर्व्हेअरना भरपाई द्यावी, कुटुंबीयांना आधार द्यावा, सर्व्हे करणाऱ्यांना ओळखपत्रे देण्यात यावे, गौरवधन वेळेत द्यावे, पीक सर्व्हे झाल्यानंतर उर्वरित वेळेमध्ये रिकामे बसावे लागते. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना इतर कामांमध्ये नेमणूक करून घ्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी मंजुनाथ कोटूर, शिवराम बशीडोणी, नागप्पा कुरबर, बसवराज नेसरगी, बसवराज हत्ती आदी सर्व्हेअर उपस्थित होते.









