शेतकरी नेत्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट : व्याज दिले नसल्याचा शेतकरी नेत्यांचा आरोप
बेळगाव : कारखान्यांना ऊसपुरवठा केलेल्या शेतकऱ्यांची बिले थकविल्याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार कारखानदारांकडून शेतकऱ्यांना बिले अदा केली आहेत. मात्र, त्यावरील व्याज अदा केले नसल्याकारणाने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन त्यासाठी पाठपुरावा केला. कारखान्यांना ऊसपुरवठा करून 7 ते 8 महिन्यांचा कालावधी उलटला तरी शेतकऱ्यांना उसाची बिले अदा करण्यात आली नव्हती. शेतकऱ्यांकडून कारखान्यांकडे पाठपुरावा करण्यात आला असला तरी कारखान्यांकडून वेळ मारून नेण्यात आली होती. शेतकऱ्यांना केवळ आश्वासने देऊन बिले थकवली होती. यावरून शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून प्रलंबित बिलांसाठी रोखठोक भूमिका घेतली होती.
त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कारखान्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन दि. 25 जूनपर्यंत 15 टक्के व्याजासह शेतकऱ्यांची बिले अदा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कारखान्यांकडून शेतकऱ्यांची बिले अदा करण्यात आली आहेत. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार 15 टक्के व्याज त्यामध्ये समाविष्ट करण्यात आले नसल्याचा आरोप शेतकरी नेत्यांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत चौकशी केली. नियमानुसार शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पाठवल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये बिल अदा करणे बंधनकारक आहे. कारखान्यांनी पंधरा दिवसात बिल अदा न केल्यास त्यावर 15 टक्के व्याज लागू होते, असा नियम आहे. मात्र, कारखान्यांनी सात ते आठ महिने बिले थकवली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याज मिळणे आवश्यक आहे, अशी भूमिका शेतकरी नेत्यांनी घेतली असून याबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याशी चर्चा केली.









