काँग्रेस नेत्यांची कृषी खात्याच्या मुख्यालयावर धडक
पणजी : राज्यात सरकार अनेक कार्यक्रम राबवित आहे. यासाठी वाट्टेल तेवढा पैसा खर्च केला जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास सरकार कमी पडत आहे. सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला असल्याने त्याला हातभार देण्यासाठी आतातरी जागल्याची भूमिका सरकारने वठवावी. शेतकऱ्यांना पिकांची आधारभूत किंमत त्वरित द्यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. करंजाळे येथील कृषी खात्याच्या मुख्यालयावर धाव घेत कृषी खात्याचे संचालक नेविल आल्फान्सो यांना निवेदन सादर करीत शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी केली. यावेळी कॅप्टन विरियातो, फर्नांडिस, मोरेना रिबेलो, जॉन नाझारेथ, एरहर्सन वालिस, विशाल वळवईकर व इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, राज्यातील पाच हजाराहून अधिक शेतकरी आधारभूत किंमत मिळण्यापासून वंचित आहेत. थ्यांना दोन पिकांची आधारभूत किंमत अद्यापही मिळालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून भात पीक, नारळ, काजू यासाठी दिली जाणारी आधारभूत किंमत वाढविण्यात आलेली नाही. जी आधारभूत किंमत दिली जाते त्यात आता खंड पडत आहे. घेल्या दोन पिकांची आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेतकरी हा राज्याचा कणा असल्याने त्याला पिकांसाठी देण्यात येणारी ही आधारभूत किमत त्वरित मिळायला हवी. गेल्या अनेक काळापासून अनुदानही वेळेत मिळत नसल्याने त्याबाबतही कृषी संचालक नेव्हील आल्फोन्सो यांचे लक्ष वेधण्यात आले.









