हेस्कॉमची फोन पे, गुगल पे सेवा पुन्हा कार्यरत
बेळगाव : नागरिकांना घरबसल्या विद्युतबिल भरता यावे यासाठी हेस्कॉमने गुगल पे, फोन पे, पेटीएम यासारख्या मोबाईल वॉलेट सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत. मागील चार दिवसांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर वापर केल्यानंतर ही सेवा आता नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहे. या सेवेचा नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन हेस्कॉमने केले आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने हेस्कॉमने मोबाईल वॉलेटमधून बिल भरण्याची सेवा काही महिन्यांसाठी थांबविली होती. यामुळे नागरिकांना हेस्कॉम कार्यालये तसेच बिलभरणा केंद्रांवर जाऊन बिल भरावे लागत होते. त्यातच राज्य सरकारने गृहज्योती योजना लागू केल्याने अनेकांची विद्युतबिले शून्य रुपये येत आहेत. त्यामुळे बिल भरण्याची समस्या काही प्रमाणात कमी झाली होती. घरगुती वीजग्राहकांचे बिल कमी झाले असले तरी व्यावसायिक विद्युतबिले मात्र सुरू आहेत. त्यामुळे फोन पे, गुगल पे यांची सेवा पूर्ववत करण्याची मागणी केली जात होती. मागील काही दिवसांपासून हेस्कॉमच्या सर्व्हर दुरुस्तीचे काम सुरू होते. हे काम काही प्रमाणात पूर्ण झाल्याने मोबाईल वॉलेटची सेवा पूर्ववत करण्यात आली. ग्रामीण भागातील सेवा अखंडित सुरू होती. आता शहरी भागातील वीजग्राहकांनाही ऑनलाईन बिल भरता येणार आहे.









