चारा छावण्याही सुरू करण्याची शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
बेळगाव “: पावसाने दडी मारली आहे. यातच वीजदर वाढविले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर साऱ्यांचेच आर्थिक बजेट कोलमडले आहे. पाऊस गेल्यामुळे पिके वाळून जात आहेत. त्यामुळे दुष्काळ जाहीर करून एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. याचबरोबर इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले आहे. जून महिना संपायला आला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे ऊस पिके पूर्णपणे वाळली आहेत. याचबरोबर इतर पिकेही करपली आहेत. पाऊस नसल्यामुळे जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्नही गंभीर बनला आहे. तेंव्हा तातडीने चारा बँक सुरू कराव्यात, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांना देखील पाणी मिळणे कठीण झाले आहे. तेंव्हा सरकारने याचा सारासार विचार करून तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
बँका व सोसायट्यांकडून होणारी कर्जवसुली थांबवावी. शेतकऱ्यांकडे पैसा नसल्यामुळे कर्ज भरणे अवघड झाले आहे. तेंव्हा नुकसान भरपाई जाहीर करून कर्जमाफीही करावी, अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली. बेळगाव एपीएमसी देखील बळकट करण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे. शेतजमिनीवरही नरेगा योजनेतील उपक्रम राबवावेत, अशी मागणी देखील करण्यात आली. पाऊस नसल्यामुळे ऊस वाळून जात आहे. भातपीक पूर्णपणे खराब झाले आहे. सोयाबिन, मूग, मका ही सर्व पिके खराब झाली आहेत. तेंव्हा तातडीने सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचा सर्व्हे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील करण्यात आली. कन्नड साहित्य भवन येथून मोर्चा काढण्यात आला. कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चुन्नाप्पा पुजेरी, सुरेश परगण्णावर, बसवराज बिच्चुर्ले, रमेश वाली, राघवेंद्र नाईक, प्रकाश नायक यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









