रेशन दुकानदार मालक संघटनेचे खात्याला निवेदन
बेळगाव : मागील चार महिन्यांपासून रेशन दुकानदारांचे कमिशन मिळालेले नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांसमोर अडचणी वाढू लागल्या आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याने तातडीने कमिशन द्यावे, अशा मागणीचे निवेदन बेळगाव रेशन दुकानदार मालक संघटनेतर्फे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक मल्लिकार्जुन नायक यांच्याकडे दिले. रेशन दुकानदारांचे कमिशन मिळाले नसल्याने दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे वेतन देणे, दुकानाचे भाडे, संगणक ऑपरेटरचे वेतन देणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे दुकानदारांचे कमिशन तातडीने द्यावे.
त्याबरोबर रेशन वितरणातील सर्व्हर डाऊनची समस्याही मार्गी लावावी. त्याचबरोबर रेशन वितरणाचे धान्य वाहतुकीदरम्यान रस्त्यावरच पडून नासाडी होऊ लागली आहे. त्यामुळे याचा फटका दुकानदारांना बसू लागला आहे. या साऱ्याचा विचार करून दुकानदारांच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी राज्य उपाध्यक्ष राजशेखर तळवार, चंबाण्णा होसमनी, दिनेश बागडे, महादेव दळवी, बसवराज दोडमनी, उमा सोनवालकर, एस. एल. कट्टी आदी उपस्थित होते.









