जिल्हा पंचायत योजनाधिकाऱ्यांची सीडीपीओंना सूचना : अहवाल सादर करावा
बेळगाव : बेळगाव तालुक्यात नव्याने बांधण्यात येत असलेल्या अंगणवाडी इमारतींचे काम अपूर्ण आहे. संबंधित तालुक्यातील बालकल्याण योजनाधिकाऱ्यांनी भेट देऊन बांधकामाची पाहणी करावी. तसेच अहवाल सादर करावा. त्याचबरोबर इमारतींचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे योजना संचालक रवी बंगारप्पान्नावर यांनी केली. येथील महिला-बालकल्याण खाते, उपसंचालक यांच्या कार्यालयात बुधवारी अंगणवाडी इमारती-मूलभूत सुविधांसंबंधी झालेल्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरून बंगारप्पान्नावर बोलत होते. अंगणवाडी केंद्रांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यासाठी महिला-बालकल्याण खात्याने अनुदान मंजूर केले आहे. ही कामे त्वरित सुरू करावीत. पावसाळ्याला सुरुवात झाल्याने प्रत्येक अंगणवाडीच्या प्रमुखांनी अंगणवाड्यांना भेट देऊन पाहणी करावी. त्याचा अहवाल सीडीपीओंना सादर करावा. 6 वर्षे पूर्ण केलेल्या मुलांना शाळेत दाखल केल्याबद्दलचा अहवाल द्यावा.
गर्भवती व बाळंतिणींना आहार, प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी पालकांची सभा घेऊन त्यांच्यासोबतचे छायाचित्र व अहवाल सादर करावा. अंगणवाडी केंद्रांना स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आवश्यक आहे. अंगणवाडीतील मुलांना उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी द्यावे. अंगणवाडीचा परिसर स्वच्छ असावा, मुलांमध्ये खोकला, ताप, सर्दी यासारखी लक्षणे दिसून आल्यास त्वरित दखल घ्यावी. अंगणवाडी केंद्रांमध्ये इलेक्ट्रिक वायरमध्ये कोठे बिघाड झालेला नाही, याची पाहणी करून घ्यावी. मातृवंदन, भाग्यलक्ष्मी, गृहलक्ष्मी लाभार्थ्यांची निवड करून अहवाल सादर करावा, अशा सूचनाही जिल्हा पंचायतीचे योजना संचालक बंगारप्पान्नावर यांनी केल्या. महिला-बालकल्याण खात्याचे उपसंचालक नागराज आर., जिल्हा संयोजक आण्णाप्पा हेगडे तसेच तालुक्यातील सीडीपीओ व कर्मचारी बैठकीला उपस्थित होते.









